Bangladesh Record In Australia, AUS vs BAN 1st Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकून बांगलादेशने इतिहासाला गवसणी घातली आहे. या मालिकेतील पहिला सामना डार्विनच्या मैदानावर पार पडला. यासह बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणारा तिसरा आशियाई देश बनला. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ५७ धावा करायच्या होत्या. हे आव्हान बांगलादेशने ९ गडी राखून पूर्ण केलं. हा बांगलादेशचा ऑस्ट्रेलियात मिळवलेला पहिलाच कसोटी विजय आहे. या विजयासह बांगलादेशने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय पूर्णपणे फसला, कारण ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. या डावात फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशकडून तन्झीदच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने ४२६ धावांचा डोंगर उभारून भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा एकदा कमी धावांवर आटोपला. २८४ धावा करुन ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसमोर विजयासाठी अवघ्या ५७ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान बांगलादेशने ९ गडी राखून पूर्ण केले आणि ९ गडी राखून ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
बांगलादेशच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद
या ऐतिहासिक विजयासह बांगलादेशचा संघ गेल्या ३० वर्षांत ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारा भारतापाठोपाठ आशियातील दुसराच संघ ठरला. त्याआधी पाकिस्तानने १९९५ मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात खेळताना पराभूत केलं होतं. त्यानंतर ३१ वर्ष उलटली आहेत, पण पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात खेळताना पराभूत करु शकलेला नाही.
आणखी खास गोष्ट म्हणजे बांगलादेशला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्यासाठी जास्त वाट पाहावी लागली नाही. बांगलादेशने हा पराक्रम तिसऱ्या कसोटी सामन्यात करुन दाखवला आहे. तर भारतीय संघाला पहिला विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर १२ व्या कसोटी सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली होती. तर बांगलादेशने ऑस्ट्रेलियात तिसरा सामना खेळताना पहिला विजय मिळवला आहे. या यादीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियातील दुसऱ्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केलं होतं.
