बांगलादेशचा संघ भारतात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार का? या मुद्यावरून उलटसुलट घडामोडी घडत आहेत. वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानला रिलीज करण्याचा आदेश बीसीसीआयने दिला होता. या आदेशाचं पालन करत आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सने मुस्ताफिझूरला रिलीज केलं. मुस्ताफिझूर खेळण्यासाठी उपलब्ध होता मात्र मैदानाबाहेरील घटनांमुळे असा निर्णय घेण्यात आला. बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. भारतात विविध ठिकाणी याविरोधात आंदोलनंही करण्यात आली.

मुस्ताफिझूरने रिलीज करण्याचा बीसीसीआयचा फैसला बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पटला नाही. त्यांनी बांगलादेशात आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली. यापुढे जात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. हा पवित्रा त्यांनी नंतर बदलला. सुरक्षिततेच्या कारणास्तव आमचे सामने भारताऐवजी अन्यत्र खेळवा अशी मागणी बांगलादेशने क्रिकेट बोर्डाने केली. मात्र आयत्यावेळी वेळापत्रक बदलता येणार नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं. यानंतर बांगलादेशने वर्ल्डकपमधला आमचा गट बदला अशी भूमिकाही घेतली. मात्र तसं करणंही शक्य नसल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. आमच्या जागी आयर्लंडला खेळवा, आम्ही त्यांच्या जागी खेळू जेणेकरून आमच्या लढती श्रीलंकेत होतील असं बांगलादेशचं म्हणणं आहे. बांगलादेशच्या भारतातील लढत कोलकाता आणि मुंबई इथे होणार आहेत. सुरक्षेचा मुद्दा असल्याचं बांगलादेश बोर्डाचं म्हणणं आहे मात्र आयसीसीच्या सुरक्षाविषयक समितीने दौरा करण्यालायक परिस्थिती आहे असं सांगितल्यावरही बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या मुद्यावर ठाम आहे.

२१ जानेवारी रोजी यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी चिन्हं आहेत. बांगलादेशच्या संघाने भारतात खेळण्यास नकार कायम ठेवला तर आयसीसी त्यांच्याऐवजी स्कॉटलंड संघाला संधी देऊ शकतं.

यानिमित्ताने बांगलादेश संघाची आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये कामगिरी कशी आहे याचा घेतलेला आढावा.

वनडे वर्ल्डकपचे प्रवासी

१९७५, १९७९, १९८३, १९८७, १९९२, १९९६ या वनडे वर्ल्डकपसाठी बांगलादेशचा संघ पात्रच ठरला नव्हता. १९९९ मध्ये बांगलादेशचं वर्ल्डकप पदार्पण झालं. मात्र त्यांना प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. २००३ स्पर्धेतही परिस्थितीत फरक पडला नाही. २००७ मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेल्या लढतीत स्पर्धेचं स्वरुप बदललं. बांगलादेशने बलाढ्य भारतीय संघाला चीतपट करत खळबळनजक विजयाची नोंद केली. त्यांनी सुपर ८ फेरी गाठली. मात्र तिथे पाडाव लागला नाही. २०११ मध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका संयुक्त यजमान होते. मात्र प्राथमिक फेरीतच त्यांनी आव्हान गुंडाळलं.

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने थोडी सुधारणा करत उपउपांत्य फेरी गाठली. मात्र चार वर्षानंतर २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या स्पर्धेत बांगलादेशची कथा मूळपदावर पोहोचली. प्राथमिक फेरीपुरताच त्यांचा प्रवास मर्यादित राहिला. २०२३ मध्ये भारतात झालेल्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशची कहाणी प्राथमिक फेरीपुरतीच राहिली.

टी२० वर्ल्डकपमध्येही निराशाच

पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपपासून बांगलादेशचा संघ सहभागी होतो आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने सुपर ८ गटात आगेकूच केली होती. मात्र या कामगिरीत सातत्य राहिलं नाही. २००९, २०१० आणि २०१२ अशा तिन्ही वर्ल्डकपमध्ये त्यांना प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. २०१६ आणि त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या २०२१ तसंच २०२२ स्पर्धेत बांगलादेशच्या कामगिरीत अल्पशी सुधारणा झाली आणि त्यांनी दुसऱ्या फेरीतून परतीचा मार्ग पत्करला. २०२४ स्पर्धेत त्यांनी थोडा पुढचा टप्पा गाठत सुपर ८ टप्पा गाठला.

चॅम्पियन्स ट्रॉफीत एकदा धडाका, मग निराशा

मिनी वर्ल्डकप या नावाने ही स्पर्धा पूर्वी ओळखली जात असे. १९९८ मध्ये झालेल्या स्पर्धेत बांगलादेशचा संघ पात्रच ठरला नाही. २००० मध्ये प्राथमिक फेरीतूनच त्यांनी घरचा रस्ता धरला. २००२ आणि २००४ मध्येही कामगिरी सर्वसाधारणच राहिली. २००६ मध्ये पात्रता फेरीतूनच ते परतले. २००९ आणि २०१३ तर बांगलादेशला स्पर्धेसाठी पात्रच होता आलं नाही.

२०१७ मध्ये त्यांनी इतिहास बाजूला सारत सेमी फायनलपर्यंत धडक मारली. या स्पर्धेतली त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत मात्र पहिला पाढे पंचावन्न ठरून प्राथमिक फेरीतूनच त्यांनी गाशा गुंडाळला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत यथातथा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत बांगलादेशची कामगिरी सुमार राहिली आहे. बांगलादेशचा क्रमांक सातत्याने तळाशी राहिला आहे.