Australia vs Bangladesh 1st Test: ऑस्ट्रेलियाचा संघ आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. पण बांगलादेशने घरच्या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाचा चांगलाच धूर काढला आहे. बांगलादेशचा संघ आता इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. डार्विनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसापासून बांगलादेशचा दबदबा पाहायला मिळाला आहे. दरम्यान ३ दिवसांचा खेळ झाल्यानंतर बांगलादेशकडे सामना जिंकण्याची आणि ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची सुवर्णसंधी आहे.

बांगलादेशकडे मोठी आघाडी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. स्टीव्ह स्मिथला वगळलं, तर इतर कुठलाही फलंदाज हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. स्मिथच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या अवघ्या १९८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने ४२६ धावांचा डोंगराइतका स्कोअर उभा केला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तंझीद हसनने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर २२८ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. ही बांगलादेशची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियाचा संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे या डावात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पुनरागमन करतील असं वाटलं होतं, पण असं काहीच झालं नाही. कारण तिसऱ्या दिवशीही बांगलादेशच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.तिसऱ्या दिवसाअखेर अवघ्या १६१ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ४ प्रमुख फलंदाज माघारी परतले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही ६७ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे ६ विकेट्स घेऊन बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

जर बांगलादेशने हा सामना जिंकला, तर हा विजय बांगलादेशसाठी अतिशय खास असणार आहे. कारण दोन्ही संघ आतापर्यंत केवळ ६ कसोटी सामने खेळण्यासाठी आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ५ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तर बांगलादेशला केवळ १ कसोटी सामना जिंकता आला आहे.बांगलादेशने जो सामना जिंकला होता, तो मायदेशात खेळताना जिंकला होता. आता ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात खेळताना हरवण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे हा विजय बांगलादेशसाठी ऐतिहासिक विजय असेल. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला २०१७ मध्ये हरवलं होतं. आता ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा पराभूत करण्याची संधी आहे.