बांगलादेशने टी२० वर्ल्डकपमधून माघार घेतल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. टी२० वर्ल्डकपसाठी बांगलादेशचे अनेक पत्रकार भारत आणि श्रीलंकेत येणार होते. त्यासाठी त्यांनी अर्ज भरलेही होते. मात्र बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्याचा फटका या पत्रकारांना बसला आहे. या पत्रकारांना वर्ल्डकपचं वार्तांकन करण्यासाठी अधिस्वीकृती (accreditation) नाकारण्यात आलं आहे.

बांगलादेशातून जवळपास दीडशे पत्रकारांनी टी२० वर्ल्डकपचं वार्तांकन करण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र त्यांच्यापैकी कोणालाच परवानगी मिळालेली नाही. या सगळ्यांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. पत्रकारांसाठी वर्ल्डकपचं वार्तांकन करणं हा कारर्किदीतील महत्त्वाचा क्षण असतो. मात्र बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे पत्रकारांना आता वर्ल्डकपचे सामने याचि देही याचि डोळा पाहणं आणि त्यासंदर्भात लिहिणं दुरापास्त झालं आहे.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, १३० ते १५० इतक्या मोठ्या संख्येने बांगलादेशच्या पत्रकारांनी टी२० वर्ल्डकपच्या वार्तांकनासाठी अर्ज भरले होते. मात्र सगळ्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मीडिया कमिटचे चेअरमन अमझाद होसेन यांनी सांगितलं.

जेवढी मला माहिती आहे त्यानुसार बांगलादेशच्या सर्वच पत्रकारांचे अक्रीडिशन नाकारण्यात आले. जवळपास दीडशे पत्रकार या स्पर्धेचं वार्तांकन करण्यासाठी उत्सुक होते. पण कोणालाही अक्रीडिशन मिळालं नाही. २० आणि २१ जानेवारीला ज्या छायाचित्रकारांना अक्रीडिशन मिळालं त्यांची परवानगी आता नाकारण्यात आली आहे.

२० जानेवारीला अक्रीडिशन मिळणार असल्याचा इमेल आययीयीकडून आला. व्हिसासाठीचं पत्रही त्यात होतं. मात्र आता मला अक्रीडिशन रद्द करण्यात आल्याचा इमेल आला असं पत्रकार मीर फरीद यांनी सांगितलं.

बांगलादेशचा संघ १९९९ पासून आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. मात्र त्यांचे पत्रकार त्याआधीपासून आयसीसी स्पर्धांचं वृत्तांकन करत आहेत. १९९६ वर्ल्डकपचं वृतांकन करणारे पत्रकार अरिफूर रहमान बाबू यांनीही अक्रीडिशन रद्द झाल्याचं सांगितलं.

जरी एखादा संघ खेळत नसेल तरी त्या देशाच्या पत्रकारांना त्या स्पर्धंचं वृत्तांकन करण्याची संधी मिळते. आम्हाला अक्रीडिशन नाकारण्याचं काही कारणच नाही. या अनाकलनीय निर्णयाचा निषेध करतो असं अरिफूर यांनी म्हटलं आहे. अरिफूर हे बांगलादेश क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्षदेखील आहेत. बांगलादेश स्पोर्ट्स प्रेस असोसिएशनशी चर्चा करून दाद मागू असं अरिफूर यांनी सांगितलं.

आयसीसीने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

बांगलादेशने सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला. आयसीसीने परिस्थितीचा आढावा घेऊन बांगलादेशच्या संघाला किंवा खेळाडूंना कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र तरीही बांगलादेश आपल्या म्हणण्यावर ठाम राहिलं. बांगलादेशने सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली. यानंतर आयसीसीने गट बदलून आयर्लंडच्या जागी संधी मिळावी अशी विनंती केली. मात्र आयत्या वेळेला वेळापत्रकात असा बदल करता येणार नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं. बांगलादेशने भारतात खेळावं अन्यथा बाहेर स्पर्धेतून बाहेर पडावं यावर आयसीसी सदस्यांनी १४-२ असं मतदान केलं. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पुनर्विचार करण्यासाठी एका दिवसाचा कालावधी देण्यात आला. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकार यांच्यात पुन्हा चर्चा झाली मात्र तोडगा निघू शकला नाही. बांगलादेशने टी२० स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने बांगलादेशच्या ऐवजी स्कॉटलंडला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.