Afghanistan vs Bangladesh: क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणं ही कुठल्याही गोलंदाजासाठी खास गोष्ट असते. पण जर कसोटी क्रिकेटमध्ये देशासाठी पहिलीच हॅट्ट्रिक असेल तर याहून खास आणखी काहीच नसेल. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे. अबू धाबीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात हॅट्ट्रिक घेताच तो बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे.
हसन महमूद हा बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी २००३ मध्ये अलोक कपालीने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. २०१३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सोहाग गाजीने हॅट्ट्रिक घेतली होती. पण हसन महमूद हा बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे.
हसन महमूदची दमदार गोलंदाजी
सामन्यातील तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना हसन महमूदने दमदार सुरुवात करून दिली. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना त्याने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. त्याने आधी इसमत आलमला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कैस अहमद फलंदाजीला आला. पण तो देखील जास्तवेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. स्टंप लाईनच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर अहमदने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षक लिटन दासच्या हातात गेला. यासह त्याने लागोपाठ २ चेंडूत २ गडी बाद केले.
लागोपाठ २ फलंदाजांना बाद केल्यानंतर हसन महमूदकडे असं काही करण्याची संधी होती. जे याआधी बांगलादेश क्रिकेटमध्ये याआधी कधीच घडलं नव्हतं. हॅट्ट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी जिया उर रहमान स्ट्राईकवर आला. हसनने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला,जो वेगाने आत आला आणि फलंदाजाच्या पॅडला जाऊन धडकला. अंपायरने आधी हा निर्णय फेटाळून लावला. त्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये दिसून आलं की, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. चेंडू ऑफ स्टंपला जाऊन लागत होता. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला आणि हसनने ऐतिहासिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.
