Bangladesh vs Australia 3rd ODI Highlights: कूपर कॉनलीच्या पहिल्यावहिल्या वनडे शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत चारीमुंड्या चीत होण्याची अवस्था टाळली. मीरपूर इथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने एका विकेटने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला एकेक धावेसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. डावखुरा शतकवीर कूपर कॉनली या विजयाचा शिल्पकार ठरला. बांगलादेशने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पहिलाच मालिका विजय आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लिट्टन दास, तौहिद हृदॉय आणि मोसादेक होसेन यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने २७४ धावांची मजल मारली. लिट्टनने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५८ धावांची खेळी केली. तौहिदने ८ चौकारांसह ८३ धावांची सुरेख खेळी केली. मोसादेकने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे झेव्हियर बार्टलेट आणि मॅट रेनशॉ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जोश इंगलिस २१ धावा करून बाद झाला. मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. अॅलेक्स कॅरे ८ धावा करून तंबूत परतला. मॅट शॉर्टला सलग तीन सामन्यात भोपळाही फोडता न आल्याने वगळण्यात आलं. शॉर्टऐवजी कॉनलीला सलामीला पाठवण्यात आलं. कॉनलीने एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही दिमाखदार शतकी खेळी साकारली. मार्नस लबूशेन (२९), कॅमेरुन ग्रीन आणि ऑलिव्हर पीक यांनी प्रत्येकी २७ धावा करत कूपरला चांगली साथ दिली. कूपरव्यतिरिक्त बाकी फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. १८ चेंडू कॉनली नॉन स्ट्राईक एन्डला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय लांबला. कॉनलीने स्ट्राईक मिळाल्यानंतर कांगारुंना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. पण मुस्ताफिझूरने त्याची खेळी संपुष्टात आणली. कॉनलीने १३ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ चेंडूत १४९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. बांगलादेशतर्फे शोरिफुल इस्लामने ६ विकेट्स पटकावत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. कॉनली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. अॅडम झंपाने शेवटच्या षटकात चौकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
कूपरचं वनडे कारकिर्दीतलं हे पहिलंवहिलं शतक आहे. ऑस्ट्रेलियाचं भविष्य म्हणून कूपरकडे पाहिलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या आयपीएल स्पर्धेत कूपरने शतकी खेळी साकारत नैपुण्याची चुणूक दाखवली होती. आशियाई उपखंडात चांगला खेळ करत कूपरने तिन्ही फॉरमॅटसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.
