मीरपूर : शकिब अल हसनची प्रभावी गोलंदाजी आणि त्यानंतर मेहदी हसन मिराज-मुस्तफीझूर रहमान यांच्यातील अखेरच्या गडय़ासाठी झालेल्या अविश्वसनीय ५१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा एक गडी आणि २४ चेंडू राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताचा डाव ४१.२ षटकांत १८६ धावांत संपुष्टात आला. के.एल. राहुलच्या (७३) अर्धशतकाखेरीज भारताकडून एकालाही मोठी खेळी करता आली नाही. शकिबने (३६ धावांत ५ बळी), तर एबादत हुसैनने (४७ धावांत ४ बळी) यांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने ४६ षटकांत ९ बाद १८७ धावा केल्या. लिटन दासच्या ४१ धावांच्या खेळीनंतर मेहदी हसन मिराजच्या नाबाद ३८ धावा निर्णायक ठरल्या. मेहदीने ३९ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह निर्णायक खेळी केली.
बांगलादेशने सामना सहज जिंकणे अपेक्षित होते; पण १८७ धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी कमालीचा भेदक मारा करून बांगलादेशसमोर आव्हान उभे केले होते. दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर नजमुल हसन शांटोला बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने मधल्या षटकांत भेदक मारा केला. वॉशिंग्टन सुंदरचाही फिरकी मारा अचूक झाला. लिटन दास (४१), शकिब अल हसन (२९), मुशफिकूर रहिम (१८), महमुदुल्ला (१४) या बांगलादेशच्या प्रमुख फलंदाजांनी सुरुवात चांगली केली; पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. बांगलादेशचा डाव ३ बाद ९५ वरून नाटय़मयरीत्या ९ बाद १३६ असा घसरला. भारत सामना जिंकेल असे दिसत असतानाच मेहदी हसन आणि मुस्तफिझूरने जिद्द सोडली नव्हती. अशातच यष्टिरक्षकाची भूमिका बजावणाऱ्या राहुलने मेहदी हसनचा झेल सोडला आणि त्यानंतर मेहदीने मागे वळून बघितले नाही. मुस्तफिझूरला साथीला घेत मेहदीने नाबाद भागीदारी रचत बांगलादेशचा विजय साकार केला.
त्यापूर्वी, भारताला प्रथम फलंदाजीचा देण्याचा निर्णय शकिबच्या फिरकीने सार्थ ठरवला. भारताचा निम्मा संघ गारद करत शकिबने पाहुण्यांच्या फलंदाजीला वेसण घातले. एबादतने चार गडी बाद करत त्याला सुरेख साथ केली. मधल्या फळीत खेळायला आलेल्या राहुलने ७० चेंडूंत ५ चौकार, ४ षटकांरांसह केलेल्या ७३ धावांमध्ये भारताला पावणेदोनशेच्या पुढे धावसंख्या नेणे शक्य झाले.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४१.२ षटकांत सर्वबाद १८६ (केएल राहुल ७३, रोहित शर्मा २७, श्रेयस अय्यर २४; शकिब अल हसन ५/३६, एबादत हुसेन ४/४७) पराभूत वि. बांगलादेश ४६ षटकांत ९ बाद १८७ (लिटन दास ४१, मेहदी हसन मिराज नाबाद ३८; मोहम्मद सिराज ३/३२, कुलदीप सेन २/३७, वॉशिंग्टन सुंदर २/१७)