लॉडरहिल (अमेरिका) : बांगलादेश-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार निकाली ठरला. बांगलादेशने या सामन्यात १९ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. सेंट्रल ब्रोवर्ड स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना आव्हानात्मक ५ बाद १८४ धावा उभारल्या. लिटन दासने ३२ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारत यात महत्त्वाची भूमिका बजावली. महमदुल्लाने नाबाद ३२ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावात आंद्रे रसेलने फक्त २१ चेंडूंत सहा उत्तुंग षटकार आणि एका चौकारासह ४७ धावा केल्या. १७.१ षटकांत विंडीजच्या धावफलकावर ७ बाद १३५ धावसंख्या लागल्या असताना रसेल बाद झाला आणि त्याच वेळी मुसळधार पावसाचा वर्षांव सुरू झाला. त्यानंतर डकवर्थ-लुइस नियमानुसार सामन्याचा निकाल लागला. लिटन दासला सामनावीर आणि कर्णधार शकिब अल हसनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. संक्षिप्त धावफलक बांगलादेश : २० षटकांत ५ बाद १८४ (लिटन दास ६१, महमदुल्ला नाबाद ३२; किमो पॉल २/२६) विजयी वि. वेस्ट इंडिज : १७.१ षटकांत ७ बाद १३५ (आंद्रे रसेल ४७; मुस्ताफिझूर रेहमान ३/३१) सामनावीर : लिटन दास मालिकावीर : शकिब अल हसन.