वर्ल्डकपनंतर लगेचच बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला वनडे मालिकेत धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. बांगलादेशने तिसऱ्या वनडेत विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. बांगलादेशने २९० धावांची मजल मारली. सलमान अली अघाच्या शतकाच्या बळावर पाकिस्तानने आव्हान जिवंत राखलं. सलमान बाद झाल्यानंतर शाहीन शहा आफ्रिदीने जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला.

६ चेंडूत १४ धावा असं समीकरण असताना बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझने फिरकीपटू रिषादच्या हाती चेंडू सोपवला. प्रमुख वेगवान गोलंदाजांचे स्पेल पूर्ण झाल्याने मेहदीसमोर रिशादला चेंडू देण्याशिवाय पर्याय उरला नाही. रिषादचा पहिला चेंडू निर्धाव पडला. दुसऱ्या चेंडूवर त्यानेच शाहीन शहा आफ्रिदीचा झेल सोडत जीवदान दिलं. तिसऱ्या चेंडूवर आफ्रिदीने दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर पाकिस्तानला एकही धाव काढता आली नाही. पाचवा चेंडू वाईड देण्यात आला. बांगलादेशने रिव्ह्यूचा निर्णय घेतला. एलबीडब्ल्यूचं अपील फेटाळण्यात आलं. मात्र चेंडू आफ्रिदीच्या पायाला लागून गेल्याचं स्पष्ट झाल्याने वाईडचा निर्णय बदलण्यात आला. वाईड रद्द झाल्याने पाकिस्तानसाठी १ चेंडू १२ धावा असं झालं. शेवटच्या चेंडूवर शाहीन शहा आफ्रिदी यष्टीचीत झाला. त्याने ३७ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून तास्किन अहमदने ४ तर मुस्ताफिझूर रहमानने ३ विकेट्स पटकावल्या. नाहिदने २ विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने पहिल्याच षटकात साहिबजाहा फरहानला गमावले. पाठोपाठ माझ सादत बाद झाला. अनुभवी मोहम्मद रिझवानला तास्किनने तंबूत परतावलं. १७/३ या स्थितीतून गाझी घोरी आणि अब्दुल समाद यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नाहिद राणाने घोरीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २९ धावा केल्या. पाठोपाठ अब्दुल समादही बाद झाला. मुस्ताफिझूर रहमानने त्याला बाद केलं. त्याने ३४ धावा केल्या. सलमान अली अघाने साद मसूदला हाताशी घेत डाव सावरला. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. मुस्ताफिझूरने सादला माघारी धाडत ही जोडी फोडली. सादने ३८ धावांची खेळी केली. अष्टपैलू आणि अनुभवी फहीम अशरफ ९ धावा करुन तंबूत परतला. नाहिदच्या गोलंदाजीवर षटकार खेचत सलमानने तिसरं वनडे शतक पूर्ण केलं. धावगतीचं दडपण वाढतं असल्यामुळे सलमानने मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न शंटोच्या हातात जाऊन विसावला. सलमानने ९८ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह १०६ धावांची वेगवान खेळी साकारली. सलमान परतल्यानंतर शाहीन शहा आफ्रिदीने सूत्रं हातात घेतली. ४९व्या आणि मुस्ताफिझूरच्या षटकात त्याने दोन षटकार वसूल केले. यामुळे पारडं पाकिस्तानच्या बाजूने झुकलं. पाचव्या चेंडूवर शाहीनने लगाववेला फटका मुस्ताफिझूरच्या गुडघ्यावर जाऊन आपटला. त्याच्या गुडघ्यावर मैदानातच उपचार करण्यात आले. ड्रेसिंगरुममध्ये परतण्याऐवजी मुस्ताफिझूरने शेवटचा चेंडू टाकून षटक पूर्ण करायचं ठरवलं. या चेंडूवर षटकार लगावण्याचा हारिस रौफचा प्रयत्न मेहदी हसनच्या हातात जाऊन विसावला.

पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. सैफ हसन आणि तांझिड हसन यांनी १०५ धावांची खणखणीत सलामी दिली. शाहीन शहा आफ्रिदीने सैफला त्रिफळाचीत केलं. त्याने ३६ धावा केल्या. नझमुल होसेन शंटोने २७ तर लिट्टन दासने ४१ धावा करत तांझिडला चांगली साथ दिली. षटकारासह तांझिडने पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली. ६ चौकार आणि ७ षटकारांसह तांझिडने १०७ धावांची खेळी केली. तौहिद हृदॉयने ४४ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. तांझिडने खेळपट्टीचा नूर समजून फलंदाजी केली मात्र बाकी फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. पाकिस्तानतर्फे हारिस रौफने ३ विकेट्स पटकावल्या.