scorecardresearch

SA Vs BAN: भारताला जमलं नाही ते बांगलादेशनं करून दाखवलं! दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार म्हणाला…

दक्षिण अफ्रिकेत झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं करून दाखवलं असंच म्हणावं लागेल. परदेशी जमिनीवर तीन सामन्यांची मालिका २-१ ने पहिल्यांदाच जिंकली.

Bangladesh
SA Vs BAN: भारताला जमलं नाही ते बांगलादेशनं करून दाखवलं! दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार म्हणाला… (Photo- ICC Twitter)

दक्षिण अफ्रिकेत झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं करून दाखवलं असंच म्हणावं लागेल. परदेशी जमिनीवर तीन सामन्यांची मालिका २-१ ने पहिल्यांदाच जिंकली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने बुधवारी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात तस्किनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला १५४ धावांत रोखले. या सामन्यात त्याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तस्किनच्या गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने दक्षिण अफ्रिकेचा १४१ चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने प्रथमच दक्षिण आफ्रिकेत एकदविसीय मालिका जिंकली आहे. ५१ वर्षांच्या एकदिवसीय इतिहासात प्रथमच बांगलादेशने दक्षिण अफ्रिकेत जाऊन त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. भारताने दक्षिण अफ्रिकेत अजून एकही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. अलीकडेच भारताने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला होता, मात्र एकदिवसीय मालिकेत ३-० असा पराभव पत्करावा लागला होता.

तस्किनशिवाय कर्णधार तमीम इक्बालने नाबाद ८७ धावांची शानदार खेळी केली. तस्किनला प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्याशिवाय लिंटन दासने ४८ धावांची खेळी खेळली.पराभवानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने सांगितलं की, “आम्ही या मालिकेत पराभूत झालो. मला वाटते की आम्ही भारताविरुद्ध ज्या तीव्रतेने खेळलो तसा खेळ दिसला नाही. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमची कामगिरी म्हणावी तशी नव्हती. मी एवढेच सांगू शकतो.”

बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालने मालिका विजयानंतर आनंद व्यक्त करत म्हणाला, “ही आमची सर्वात मोठी कामगिरी असून मोठा विजय आहे. आम्ही परदेशात मालिका जिंकू शकतो, हा विजय आम्हाला पुढे जाण्याचा आत्मविश्वास देईल. आम्हाला खूप अभिमान वाटतो, आमचा विश्वास आहे की आम्ही एक चांगला संघ आहोत. गेल्या ५-६ वर्षांत आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. परदेशात मालिका जिंकणे कठीण होते, परंतु यावेळी आम्ही ते करू शकलो.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bangladesh won one day series in sa first time rmt

ताज्या बातम्या