बार्सिलोना : युरोपीयन फुटबॉलमधील बलाढय़ संघ बार्सिलोनाचे युरोपा लीगमधील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. जर्मन संघ आइन्ट्रॅक फ्रँकफर्टने दोन टप्प्यांतील सामन्यांत बार्सिलोनाला एकूण ४-३ अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली.

या लढतीचा पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. तर बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात यजमानांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, बार्सिलोनाला या सामन्यात २-३ असा पराभव पत्करावा लागला. फ्रँकफर्टकडून फिलिपे कॉस्टिचने (चौथे आणि ६७वे मिनिट) दोन, तर राफाएल सँटोस बोरेने (३६वे मि.) एक गोल केला. बार्सिलोनाकडून सर्जिओ बुस्केट्स आणि मेंफिस डिपे यांनी ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत गोल केले. मात्र, बार्सिलोनाला आगेकूच करण्यासाठी ते अपुरे ठरले.

फ्रँकफर्टचा उपांत्य फेरीत इंग्लिश संघ वेस्ट हॅमशी सामना होईल. वेस्ट हॅमने उपांत्यपूर्व फेरीत लियॉनवर एकूण ४-१ अशा गोल फरकाने मात केली. तसेच रेंजर्स आणि आरबी लेपझिग या संघांनाही उपांत्य फेरी गाठण्यात यश आले.