एपी, ब्रिस्बेन : तीन ग्रँडस्लॅम विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅश्ले बार्टीने वयाच्या २५व्या वर्षी टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या बार्टीने अचानक केलेल्या घोषणेमुळे चाहते व अन्य टेनिसपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बार्टीने बुधवारी ‘इन्स्टाग्राम’वर चित्रफीत प्रकाशित करत टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. या वेळी तिला अश्रू अनावर झाले. मात्र, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ असल्याची तिची भावना आहे. बार्टीचा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गोल्फपटू गॅरी किसीकशी साखरपुडा झाला. त्यामुळे आता जीवनातील इतर गोष्टींवर अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न असल्याचे बार्टी म्हणाली. टेनिसपटू म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक ऊर्जा आपल्यात शिल्लक नसल्याचेही बार्टीने ‘इन्स्टाग्राम’वर तिची दुहेरीतील माजी साथीदार केसी डेलाक्वाशी बोलताना नमूद केले.

टेनिसला अलविदा करण्याची ही बार्टीची पहिली वेळ नाही. २०११मध्ये तिने वयाच्या १५व्या वर्षी विम्बल्डनच्या कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले होते. मात्र, त्यानंतर दोन वर्षांनी अपेक्षांचे दडपण आणि सतत प्रवासामुळे थकवा, या कारणांनी तिने टेनिसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. मग ती क्रिकेटकडे वळली. तिने महिलांच्या बिग बॅश लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधित्वही केले. परंतु, २१ महिन्यांच्या कालावधीनंतर तिने टेनिसमध्ये पुनरागमन केले. ३ बार्टीने आपल्या कारकीर्दीत तीन ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली. तिला फ्रेंच (२०१९), विम्बल्डन (२०२१) आणि ऑस्ट्रेलियन (२०२२) या ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यात यश आले. ११४ बार्टी गेले सलग ११४ आठवडे महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होती. तिने मागील २६ पैकी २५ सामने जिंकले.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

टेनिसपटू म्हणून सर्वोच्च स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शारीरिक आणि भावनिकदृष्या तुम्ही स्वत:ला पूर्णपणे झोकून देणे गरजेचे असते. मात्र, माझ्यात आवश्यक ऊर्जा राहिलेली नाही. मी पहिल्यांदाच हे मोकळेपणाने बोलत आहे. टेनिसपासून दूर जाण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे मला मनापासून पटले आहे. त्यामुळे आज मी हा अवघड निर्णय घेत आहे.

– अ‍ॅश्ले बार्टी