भारताच्या बसंत कुमारने अमेरिकेतल्या योजीन इथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदकावर नाव कोरलं. उंच उडी प्रकारात बसंत कुमार मेघवालने रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत, या प्रकारात पदक पटकावणारा बसंत कुमार पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला.
राजस्थानमधल्या सीमेजवळच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगढच्या १९वर्षीय बसंतने २.२१ मीटरचं अंतर पार केलं. अल्जेरियाच्या युनुस अयाचीने सुवर्ण तर ग्रेट ब्रिटनच्या ओटिस पूलने कांस्यपदक नावावर केलं. तिन्ही पदकवीरांनी २.२१ मीटरचं अंतर पार केलं. २.२४ मीटरची वेस ते ओलांडू शकले नाहीत. पदकाचा निर्णय अंतर कोणी कितव्या प्रयत्नात पार केलं त्यानुसार ठरवण्यात आलं. अयाचीने पहिल्याच उडीत २.२१ मीटरचं अंतर गाठलं. बसंत आणि पूल यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात हे अंतर पार केलं. बसंत नौदलाचं प्रतिनिधित्व करतो.
उंच उडीतील माजी राष्ट्रीय विजेत्या सहाना कुमारी यांच्या मार्गदर्शनात बसंत सराव करतो. याआधी बसंतची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २.११ मीटर होती. त्यात प्रचंड सुधारणा करत बसंतने पदकावर नाव कोरलं.
याच स्पर्धेत लांब उडी प्रकारात शाहनवाझ खानने कांस्यपदक पटकावलं. आशिष यादवने भालाफेकीत रौप्यपदकावर नाव कोरलं. शाहनवाझने ७.८४ मीटर अंतरावर उडी मारत पदक पक्कं केलं.
