Batsmans Who Failed To Win Orange Cap: आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गेल्या हंगामात जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यामुळे यावेळी या संघाला पहिला सामना खेळण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत जो फलंदाज सर्वाधिक धावा करतो, तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो. दरम्यान या स्पर्धेत काही असे फलंदाज देखील आहेत, ज्यांनी सर्वाधिक धावा तर केल्या आहेत पण एकदाही ऑरेंज कॅप जिंकू शकलेले नाहीत. कोण आहेत ते फलंदाज? जाणून घ्या.
एमएस धोनी:
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या नावे आयपीएलच्या ५ ट्रॉफी जिंकण्याची नोंद आहे. तो संघाला जेव्हा गरज असते त्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी येत असतो. त्याच्या नावे ५४३९ धावा करण्याची नोंद आहे. त्याने अनेकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून दिला आहे. पण तो आतापर्यंत एकदाही ऑरेंज कॅप जिंकू शकलेला नाही.
सुरेश रैना:
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आधी सुरेश रैनाच्या नावे होता. इतर कुठला फलंदाज त्याच्या आसपासही नव्हता. त्याला आपल्या आयपीएल कारकिर्दीत २०० हून अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ५५२८ धावा केल्या. काही वर्ष तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता. पण तरीदेखील तो एकदाही ऑरेंज कॅप जिंकू शकला नाही.
एबी डिव्हिलियर्स:
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्सने देखील या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. सुरवातीच्या काही हंगामात त्याला दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळाली. मग त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग बनला. या संघाकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला. त्याच्या नावे ५१६२ धावा करण्याची नोंद आहे. पण तरीदेखील तो एकदाही ऑरेंज कॅप जिंकू शकला नाही.
शिखर धवन:
शिखर धवनचा देखील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. त्याने २२२ सामन्यांमध्ये ६७६९ धावा केल्या आहेत. पण एकदाही ऑरेंज कॅप जिंकू शकला नाही.
रोहित शर्मा:
मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाला ५ वेळा जेतेपदाचा मान मिळवून दिला. यादरम्यान त्याने स्पर्धेतील पहिल्या हंगामापासून ते आतापर्यंत ७०४६ धावा केल्या आहेत. पण आजवर एकदाही ऑरेंज कॅप जिंकू शकला नाही.
