Most Runs In A Single Over In Test Cricket: गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय टी-२० संघाला आधी आयर्लंड आणि मग त्यानंतर इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं. आता भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान जाणून घ्या कोण आहेत कसोटी क्रिकेटमधील एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने २००७ टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. हा रेकॉर्ड त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर केला होता. मुख्य बाब म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्येही एकाच षटकात सर्वाधिक धावा खर्च करण्याचा रेकॉर्ड हा स्टूअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे. पण यावेळी युवराज सिंग नव्हे, तर जसप्रीत बुमराहने ब्रॉडची धुलाई केली होती. २०२२ मध्ये झालेल्या भारत- इंग्लंड कसोटी मालिकेतील बर्मिंघम कसोटीत बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात विक्रमी ३५ धावा कुटल्या होत्या. बुमराहचा हा रेकॉर्ड आजवर कुठल्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही.

मुख्य बाब म्हणजे बुमराहने शेवटी फलंदाजीला येऊन ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रायन लारा यांनी २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटीत पीटरसनच्या एकाच षटकात २८ धावा वसूल केल्या होत्या. २००३ पासून ते २०२२ पर्यंत कसोटीतील एकाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा ब्रायन लारा यांच्या नावावर होता. पुढे बुमराहने हा रेकॉर्ड मोडून काढला होता.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज जॉर्ज बेलीने २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात अनुभवी गोलंदा जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला होता. त्याने अँडरसनच्या एकाच षटकात २८ धावा वसूल केल्या होत्या. यासह त्याने ब्रायन लाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. त्याच्याकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने ब्रायन लारा आणि जॉर्ज बेलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. इंग्लंडविरुद्ध खेळताना केशव महाराजने जो रुटच्या एकाच षटकात २८ धावा केल्या होत्या. तर शाहिद आफ्रिदीने २००५ मध्ये हरभजन सिंगच्या षटकात २७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकने देखील २०२२ मध्ये रावलपिंडी कसोटीत पाकिस्तानच्या जाहीद महमूदविरुद्ध खेळताना २७ धावा वसूल केल्या होत्या.