संदीप द्विवेदी
समजा भारताला यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठता आली नाही आणि असं का झालं याची कारणमीमांसा बीसीसीआयला करायची असेल तर त्यांनी लखनौमध्ये झालेला आयपीएलचा एक सामना केसस्टडी म्हणून पाहावा. टेस्ट क्रिकेट अस्तंगत होतंय, मगरीचे अश्रू ढाळत काही चाहते बोलत असतील तर लखनौ-राजस्थान सामन्यात टेस्ट खेळणाऱ्या काही खेळाडूंचे फटके तुम्ही नक्कीच पाहायला हवेत. अर्थात यात चकित होण्यासारखं, धक्का बसेल असं काहीही नाही. हे होणारच होतं.
याच सामन्यादरम्यान मोहम्मद शमीने घेतलेल्या दोन विकेट्स भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या फलंदाजांना येत्या काळात काय अडचणींना सामोरं जावं लागेल याचं प्रतीक होतं. भारतासाठी टेस्ट खेळलेल्या विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलला ३५ शमीने चेंडू टाकला. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि ऑफस्टंपच्या थोड्या बाहेरच्या बाजूने निघाला. जुरेलने चेंडू खेळला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन अलगद विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. शमीने टाकलेल्या त्या चेंडूचं कॉमेंटेटर्सनी प्रचंड कौतुक केलं, जणू शतकातला सर्वोत्तम चेंडू टाकला अशा थाटात. तो चेंडू खासच होता. ज्या पद्धतीने टप्पा पडून चेंडू हलकेच बाहेरच्या दिशेने स्विंग झाला आणि जुरेल त्या सापळ्यात अडकला. शमी आणि चेंडूने दिलेला गुंगारा जुरेलला झेपला नाही. कॉमेंटेटर्सनी त्या चेंडूचं कौतुक केलं नसतं तरच नवल.
शमीने टाकलेला चेंडू टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांसाठी रोजीरोटी आहे. बहुतांश वेळा फलंदाज असा चेंडू सोडून देऊन आपली विकेट वाचवतात. पुढे होऊन ते चेंडू तटवून काढतात किंवा सोडून देतात. पण आयपीएलमध्ये यातलं काहीही होत नाही. जसं जुरेलच्या बाबतीत झालं. फलंदाजांचे पाय हलतच नाहीत. चेंडू सोडणं आणि विकेटकीपरकडे जाऊ देणं म्हणजे तुमच्या धडाकेबाज फलंदाज टॅगला धक्का लागल्यासारखं आहे असं मानलं जातं.
शमीने त्या सामन्यात यशस्वी जैस्वाललाही बाद केलं. यशस्वीला येत्या काही महिन्यांमध्ये अशा पद्धतीच्या चेंडूचा सामना करायचा आहे. कारण टेस्ट संघाचा तो अविभाज्य घटक आहे. भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर गावस्कर करंडकासाठी भारतात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत आता सहाव्या स्थानी आहे. याचं कारण न्यूझीलंड आणि आफ्रिकेविरुद्धची मालिका अनिर्णित झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारायची असेल तर गुणतालिकेत आणखी घसरण होणं भारतीय संघाला परवडणारं नाही.
यशस्वीकरता शमीने उसळत्या चेंडूने सुरुवात केली. दोन्ही चेंडूवर पूल करून चौकार वसूल करणं अपेक्षित होतं. तिसऱ्या चेंडूवर शमीने त्याची जादू दाखवली. लेग मिडल स्टंप टप्प्यापासून कट होऊन फलंदाजाच्या डोक्याच्या उंचीपर्यंत गेला. जैस्वालने हूकचा फटका मारायचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन विकेटकीपरकडे गेला. तुम्ही कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असाल, तुमच्या हालचाली एकदम चपळ असतील, पण तरी तुम्ही चांगल्या चेंडूला योग्य तो सन्मान द्यायला हवा असं जुनेजाणते सांगतात. पण आयपीएलमध्ये तुम्ही डक म्हणजे खाली वाकून चेंडू विकेटकीपरकडे जाऊ देत नाही. तसं केलं तर फटकेबाजीतली तुमची पत एकदम खाली घसरू शकते.
लखनौच्या डावात ऋषभ पंत फलंदाजीला आला. दुसऱ्याच षटकात त्याला यावं लागलं. त्याच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा उंचपुरा डावखुरा नांद्रे बर्गर होता. पंतला टाकलेला दुसरा चेंडू ऑफस्टंपबाहेरचा उसळता चेंडू होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये बेजबाबदार फटक्यांसाठी पंतवर जोरदार टीका झाली होती. पंतने तो चेंडू लेगसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याला वाटलेलं त्यापेक्षा अधिक वेगाने आणि उसळी मारून आला. चेंडू बॅटची हलकी कड घेऊन विकेटकीपरकडे गेला. खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी फलंदाज काही चेंडू घेतात. पण हे आयपीएल आहे. इथे आल्या चेंडूपासून तुडवावं लागतं. नाहीतर ब्रँड-ऑरा सगळं कमी होतं.
फलंदाजीतल्या या अपयशासाठी लखनौच्या खेळपट्टीला दोष द्यावा का? लखनौचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना तसाच काहीसा सूर आळवला. ते म्हणाले, या खेळपट्टीवर पूर्वीच्या वाका म्हणजे पर्थच्या मैदानावर खेळायचो तसं खेळणं गरजेचं होतं. लँगर यांचा जन्म पर्थचा. त्यांनी घरच्या मैदानावर १० टेस्ट खेळल्या. तिथे काही शतकंही झळकावली. त्यांनी लखनौच्या खेळपट्टीची वॅकाशी केलेली तुलना मालकांना द्यायचं कारण म्हणून खपू शकतं पण ज्यांना वॅकाचा इतिहास माहिती आहे त्यांना ते पटणारं नाही. वॅकावर, जेफ थॉमसन यांना टाकलेला एक बाऊन्सर एका टप्प्यात सीमारेषेपलीकडे गेला होता. लखनौची खेळपट्टी नक्कीच वॅकासारखी नव्हती. खेळपट्टीला दोष देऊन फलंदाजांचं अपयश लपवता येणार नाही.
भारताच्या फलंदाजांनी लँगर यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. याआधीही आयपीएलने भारताच्या टेस्ट संघाचं नुकसान केलं आहे. पण आता निर्णायक क्षण आला आहे. आतापर्यंत भारतात टेस्ट मॅच म्हणजे भारतीय फिरकीपटूंचं प्राबल्य आणि ३ दिवसात कसोटी खिशात असं समीकरण होतं. पण आता तसं नाही. विदेशी फिरकीपटू दमदार कामगिरी करत आहेत. भारताचे गोलंदाज २० विकेट्स पटकावण्याच्या क्षमतेचे आहेत पण भारतीय फलंदाज ५ दिवसांच्या क्षमतेचे आहेत का? हा खरा प्रश्न आहे.
वर्ल्डकपविजेते कर्णधार कपिल देव यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना क्रिकेटपटू कसे गोल्फर होत चालले आहेत हे समजावून दिलं होतं. हाय बॅकलिफ्ट आणि स्विंगमुळे पल्लेदार फटके लगावणं शक्य झालं आहे असं कपिल म्हणाले. प्रशिक्षकही गोल्फपटू होण्यास सुचवत आहेत. बॅट्समनचा बेस तगडा हवा असं ते सांगतात जेणेकरून मोठा फटका खेळू शकतील. टी२० कोचिंगमधून फूटवर्क अर्थात पदलालित्य हा मुद्दाच गायब झाला आहे. रेंज हिटिंग हा परवलीचा शब्द झाला आहे. सरावावेळी फलंदाजांची बॅट शरीराला समांतर असते आणि डोक्यामागे असते. त्यांना पाहून बेसबॉलपटूच आहेत असं वाटू शकतं. प्रशिक्षक त्यांना फुलटॉस चेंडू टाकतात आणि फलंदाज जोरकस पद्धतीने चेंडूला स्टँड्समध्ये भिरकावून देतात. यासाठी पदलालित्य लागत नाही. आयपीएलमध्ये फूटवर्क हा विषय कालबाह्य होतो आहे.
याच कारणामुळे टी२० वर्ल्डकप संघनिवडीवेळी शुबमन गिलऐवजी संजू सॅमसनला प्राधान्य देण्यात आलं. गिलच्या बाबतीत फूटवर्कचा विषय आहे. तो फ्रंटफूटवर येतो आणि कव्हरच्या पट्ट्यात मारतो. दुसरीकडे संजूचं तसं नाहीये. संजू क्रीजमध्ये पाय रोवून उभा राहतो आणि प्रचंड स्विंगसह चेंडूला भिरकावून देतो. तो अधिक षटकार लगावू शकतो असं एका तज्ज्ञाने सांगितलं.
प्रत्येकाला षटकार आवडतात. प्रक्षेपणकर्त्या कंपनीलाही षटकारच पसंत आहेत. टीव्हीवाल्यांच्या मर्जीनुसार खेळपट्टी तयार केली जाते अशी कुजबुज रंगते. षटकारांची टांकसाळ टीव्हीसाठी फलदायी ठरते?
यंदाच्या हंगामात युवा मंडळी मनात आलं की षटकार चोपत आहेत. सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाच सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. आयपीएलचे टीआरपी रेटिंग्ज कमी होत आहेत अशीही चर्चा आहे. काही सूचक गोष्टी आहेत. जाहिराती खेळात व्यत्यय आणत नाहीत. स्ट्रॅटेजिक टाईमआऊट वेळीही कॉमेंटेटर्स क्रिकेटविषयी बोलत असतात. आयपीएलचं खरंखुरं ऑडिट झालं तर सपाट आणि गतप्राण खेळपट्ट्यांना बराच दोष जाईल. पाटा खेळपट्टीवर षटकारांच्या चळती आयपीएलचं आणि टेस्ट क्रिकेटचं नुकसान करत आहेत.
