Batting Coach Sitanshu Kotak On Rohit Sharma: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना कार्डिफच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातही रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अवघ्या ११ धावा करुन माघारी परतला होता. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो २६ धावांवर बाद होऊन माघारी परतला. या सामन्यादरम्यान एकच चर्चा रंगली, ती म्हणजे रोहित शर्माच्या निवृत्तीची. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, असं म्हटलं जात आहे. दरम्यान दुसऱ्या वनडे सामना झाल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मा सध्या फलंदाजीत संघर्ष करताना दिसून येत आहे, पण फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्या मते, तो लॉर्ड्सच्या मैदानावर चांगली खेळी करु शकतो. पत्रकार परिषदेत बोलताना सितांशु कोटक म्हणाले की, “रोहितसारखा महान खेळाडू दबावात असेल, असं मला मुळीच वाटत नाही. गेल्या २ सामन्यांमध्ये त्याने धावा केलेल्या नाहीत, पण त्याने काही विशेष फरक पडत नाही. आम्हाला अपेक्षा होती की, त्याने आज मोठी खेळी करावी, पण तसं काही घडलं नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “रोहित संघर्ष करतोय, असा शब्द मी वापरणार नाही. अनेकदा फलंदाजांना हवा तसा सूर सापडत नाही आणि हे कोणाच्याही बाबतीत घडू शकते. लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यात तुम्हाला रोहित शर्माची पूर्णपणे वेगळी खेळी पाहायला मिळू शकते.” रोहित पहिल्या वनडे सामन्यात सॅम करनच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने सॅम करनचं षटक खेळून काढलं, पण विल जॅक्सने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्याने विल जॅक्सच्या गोलंदाजीवर स्विप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.
रोहित लॉर्ड्सवर शेवटची इनिंग खेळणार?
माध्यमातील वृत्तानुसार रोहित शर्मा भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा वनडे सामना हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. येत्या २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. निवडकर्त्यांनी या स्पर्धेसाठी संघबांधणी करायला सुरुवात केली आहे. भारताला टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा या सेटअपचा भाग नसल्याची माहिती निवडकर्त्यांनी दिली आहे. निवडकर्त्यांनी रोहितला स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे रोहितकडे आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही. दरम्यान रोहित लॉर्ड्सच्या मैदानावरी शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करून आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
