दुबई : एकाच मैदानावर खेळायला मिळाल्यामुळे भारताला फायदा झाला या टिकेत अर्थ नाही. जिंकण्यासाठी खेळपट्टीचे स्वरुप किंवा परिस्थिती महत्वाची नसती, तर तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागते, असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी व्यक्त केले.

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अंतिम सामना होणार आहे. सामन्यापूर्वीच्या शुक्रवारच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कोटक यांनी या सगळ्या चर्चा भारताने जिंकण्यास सुरुवात केल्यानंतरच सुरू झाल्या याकडे लक्ष वेधले.

‘‘खेळपट्टीच्या स्वरुपामुळे आम्हाला काय फायदा झाला हे समजत नाही. आम्ही जिंकल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. यावर काय बोलायचे ते कळत नाही. खेळपट्टीचे स्वरुप आणि परिस्थिती काहीही असो, तुम्हाला जिंकायचे असेल, तर चांगले क्रिकेट खेळणे आवश्यक असते,’’असे कोटक म्हणाले.

‘‘तुम्ही जर चांगले क्रिकेट खेळला नाही, तर तुम्हाला तक्रारी करता येत नाही. जिंकल्यावर त्या संघाला फायदा झाला हे बोलण्यातही काही अर्थ नाही. आम्ही फक्त येथे सराव करतो आणि खेळतो म्हणून आम्हाला फायदा झाला असे मला वाटत नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो हेच सत्य आहे,’’असेही कोटक यांनी सांगितले.

आमचा सराव ‘आयसीसी’ प्रशिक्षण केंद्रावर होते आणि सामने ‘डीआयसीएस’मधील खेळपट्ट्यांवर खेळतो. दोन्हीचे स्वरुप वेगळे आहे. मग आम्हाला कशाचा फायदा झाला या प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या म्हणण्याचे समर्थन केले.

‘‘साखळी सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळविला म्हणजे आम्ही मानसिक आघाडी घेतली ही धारणाही चुकीची आहे. हा खेळ आहे. जो चांगले खेळतो तो जिंकतो. त्यामुळे मैदानावर उभे राहून फक्त चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. अंतिम सामना कसा खेळायचा याचा विचार आम्हाला करावा लागेल,’’असेही कोटक म्हणाले.

के एल राहुलच्या विचारसरणीत लवचिकता

के एल राहुलने सहाव्या क्रमांकावर खेळायला येण्याचीही चर्चा सुरू आहे. पण, राहुलने हा बदल स्वीकारला आहे. त्याच्या विचारसरणीत लवचिकता आहे. तो सलामीला खेळू शकतो, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर त्याने खेळ केला आहे आणि सहाव्या क्रमांकावर खेळण्याचाही क्षमता त्याने दाखवली आहे . त्याने परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. मुख्य म्हणजे तो ज्या भूमिकेत खेळत आहे, त्यात तो खूप आनंदी आहे, असेही कोटक यांनी सांगितले.