चॅम्पियन्स लीग चषकाच्या विजेत्या बायर्न म्युनिचने कडवी झुंज देत व्हीएफबी स्टुटगार्ट संघाचा ३-२ असा पराभव करून जर्मन चषकावर नाव कोरले. गेल्या रविवारी पाचव्या युरोपियन चषकावर नाव कोरणाऱ्या बायर्न म्युनिकने बुंडेसलीगा जेतेपदासह १६व्यांदा जर्मन चषक पटकावला.
आत्मविश्वासात असलेल्या बायर्न म्युनिकने धडाकेबाज सुरुवात केली. आघाडीवीर मारियो गोमेझ याने दोन गोल करत बायर्न म्युनिकचा आत्मविश्वास आणखी उंचावला. पहिल्या सत्रात थॉमस म्युलरने पेनल्टीवर गोल करत बायर्न म्युनिकला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र ७१व्या मिनिटाला स्टुटगार्टच्या मार्टिन हेन्रिक याने गोल करत सामन्यात रंगत आणली. त्यानेच सामना संपायला १० मिनिटे शिल्लक असताना दुसरा गोल केला. पण बरोबरी साधण्यात स्टुटगार्ट संघाला अपयश आले.
बार्सिलोनाचे गुणांचे शतक
माद्रिद : स्पॅनिश लीगवर आधीच नाव कोरणाऱ्या बलाढय़ बार्सिलोनाने अखेरच्या सामन्यात मलगा संघाचा ४-१ असा पराभव करून स्पर्धेत १००व्या गुणांची नोंद केली. प्रशिक्षक टिटो व्हिलानोव्हा यांनी पहिल्याच मोसमात बार्सिलोनाला १०० गुण मिळवून देत रिअल माद्रिदने गेल्या वर्षी रचलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली. डेव्हिड व्हिला, सेस्क फॅब्रेगस आणि मार्टिन मोन्टोया यांच्या गोलमुळे बार्सिलोनाने १६व्या मिनिटालाच ३-० अशी आघाडी घेतली होती. आन्द्रेस इनियेस्टाने चौथा गोल केला. मलगाच्या प्रेडो मोरालेस याने एकमेव गोल झळकावला.