डॉर्टमंड : तारांकित आक्रमक रॉबर्ट लेवांडोवस्कीने साकारलेल्या दोन गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने जर्मन सुपर चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यात बोरुशिआ डॉर्टमंडला ३-१ अशी धूळ चारली. बायर्नने सर्वाधिक नवव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावताना जर्मन फुटबॉलमधील आपली सत्ता कायम राखली.

दरवर्षी बुंडेसलिगा आणि डीएफबी पोकल या जर्मनीमधील दोन फुटबॉल लीगच्या विजेत्यांमध्ये या चषकासाठी चढाओढ रंगते. २०२०-२१च्या हंगामात बायर्नने बुंडेसलिगा, तर डॉर्टमंडने डीएफबी पोकल स्पर्धा जिंकली. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री डॉर्टमंड येथील इडय़ुना पार्क फुटबॉल स्टेडियमवर २४ हजार चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते.

जुलिआन नागल्समन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बायर्नसाठी लेवांडोवस्कीने अनुक्रमे ४१ आणि ७४व्या मिनिटाला दोन गोल केले. थॉमस म्युलरने (४९ मि.) बायर्नसाठी तिसरा गोल नोंदवला. डॉर्टमंडसाठी मार्को रुइसने ६४व्या मिनिटाला एकमेव गोल केला. मात्र अन्य खेळाडूंकडून पुरेशी साथ न लाभल्याने डॉर्टमंडला सातव्यांदा जेतेपद मिळवण्यात अपयश आले.