‘टी-२० नेतृत्वत्यागाबाबत विचारणाच नाही’;  सौरव आणि बीसीसीआय यांच्यातील विसंवाद उघ

भारतीय क्रिकेटसाठी बुधवारचा दिवस नाट्यमय घडामोडींचा ठरला. ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदाही पुनर्विचार करण्याचे सुचवले नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी संघ जाहीर करण्याच्या ९० मिनिटांपूर्वी एकदिवसीय प्रकारातील कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्याचा गौप्यस्फोट विराट कोहलीने केला. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार कोहली यांच्यात सुसंवाद नसल्याचे स्पष्ट झाले. 

कोहलीने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडून  भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वपदही काढून मुंबईकर रोहित शर्माकडे सोपवण्यात आले. विशेष म्हणजे या मुद्द्यावर, ‘विराटला टी-२० कर्णधारपद सोडण्याविषयी फेरविचार करण्याची विनंती केली. पण त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे आणि मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत म्हणून रोहितला कर्णधार केले’ असे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केले होते. त्याच्याशी पूर्ण विसंगत विराटचे बुधवारचे विधान ठरले.

आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून कोहली विश्रांती घेणार असल्याच्या चर्चाही समाजमाध्यमांवर रंगू लागल्या. कोहलीने या सर्व चर्चेत अजिबात तथ्य नसल्याचे निक्षून सांगितले.

कोहली म्हणतो…

आफ्रिका दौऱ्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. ‘बीसीसीआय’ने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. कसोटी संघाबाबत संवाद झाल्यावर बैठक संपण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना निवड समितीच्या अध्यक्षांनी मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज…

रोहित शर्मा कर्णधार झाल्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेत असल्याच्या केवळ अफवाच असल्याचे कोहलीने नमूद केले. ‘‘रोहितसोबत माझे नाते चांगले आहे, हे मी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ठणकावून सांगत आहे. परंतु तरीही माझ्या कृत्याचा नेहमी त्याच्याशी संबंध जोडला जातो. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी खेळणार आहे. त्यामुळे मी विश्रांती घेण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका,’’ असे कोहलीने अखेरीस स्पष्ट केले.