विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाला रविवारी सलग दुसऱ्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करल्यामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. भारताने या सामन्यामध्ये केलेली कामगिरी पाहून अनेक भारतीय चाहते संतापलेले आहेत. सर्वोत्तम संघनिवडीचा दावा करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्ही लढतींमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा खेळ केला. २४ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताला धूळ चारली. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध भारताला विजय अत्यावश्यक होता. मात्र तसे न झाल्याने भारतीय संघावर चोहीकडून टीकेचा भडीमार करण्यात येत आहे. 

भारतीय चाहत्यांचं प्रतिनिधिक मत मांडणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामधून थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला तुम्ही देव नाहीत हे लक्षात घ्या असा टोला लगावण्यात आलाय. तसेच खेळाडूंनाही तुम्ही आयपीएल खेळत नसून देशासाठी खेळताय याचं भान ठेवा असं सांगण्यात आलंय.

भारत न्यूझीलंड सामन्यानंतर मैदानाबाहेर पडणाऱ्या भारतीय चाहत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या प्रयत्नादरम्यान एका भारतीय चाहत्याने अगदी मनमोकळेपणे आपली नाराजी कॅमेरासमोर व्यक्त केली. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. “आजच्या सामन्यामधून काही धडे घेण्याची गरज आहे. तुम्हाला फार अहंकार आला तर काय होतं याचं हे उदाहरण आहे. हे घडण्यामागील पहिलं कारण बीसीसीआय आहे आणि दुसरं आयपीएल. आपण देव नाही आहोत हे बीसीसीआयने लक्षात घ्यायला हवं. ठिकाणावर या आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे ते पाहा. खेळाडूंनाही मानसिक दृष्ट्या आपण आयपीएल खेळत नसून देशासाठी खेळताय हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असू शकता पण मैदानात खेळताना तुम्हाला ते खेळातून दाखवता आलं पाहिजे,” असं हा चाहता या व्हिडीओ म्हणताना दिसतोय.

या चाहत्याच्या मागून भारतीय संघाच्या जर्सीमध्ये जाणारे चाहतेही थम्ब डाऊनचा इशारा करत भारतीय संघाची कामगिरी सुमार झाल्याने नाराज असल्याचं सुचित करताना दिसतायत.