India Tour Of Zimbabwe:सध्या भारतात आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयकडून द्विपक्षीय मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर जुलै महिन्यात भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान हे सामने कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

भारत-न्यूझीलंड मालिकेतील सामने कधी आणि कुठे होणार?

बीसीसीआयने काही दिवसांपू्र्वीच वेळापत्रकाची घोषणा केली होती. या वेळापत्रकानुसार, भारतीय संघाचा होम सिझन जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. भारतात भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १९ जुलैला खेळवला जाईल.

इंग्लंड दौरा झाल्यानंतर भारतीय खेळाडू ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्बाब्वेविरूद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मालिकेतील पहिला सामना २३ जुलैला खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना २५ जुलैला आणि मालिकेतील शेवटचा सामना २६ जुलैला खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हरारेच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली जात आहे. पण वयाच्या १५ व्या वर्षी त्याला पदार्पण करण्याची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत- झिम्बाब्वे मालिकेचं वेळापत्रक (India vs Zimbabwe T20I Series Schedule)

भारत विरूद्ध झिम्बाब्वे- पहिला टी-२० सामना – २३ जुलै २०२६
भारत विरूद्ध झिम्बाब्वे- दुसरा टी-२० सामना- २५ जुलै २०२६
भारत विरूद्ध झिम्बाब्वे -तिसरा टी -२० सामना- २६ जुलै २०२६

झिम्बाब्वेचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. झिम्बाब्वेकडेया स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी होती, पण ही संधी थोडक्यात हुकली होती. झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. तर भारतीय संघाला कडवी झुंज दिली होती. झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने २० षटकात २५६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली होती. भारताने हा सामना ७२ धावांनी आपल्या नावावर केला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळू शकते.