BCCI Announced Cash Prize For Team India: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह लागोपाठ दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपटी ट्रॉफी उंचावली. तसेच हे एकूण तिसरं जेतेपद ठरलं. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासाठी १३१ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.
कुठल्याही मोठ्या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर आयसीसीकडून भारतीय संघाला बक्षिसाची रक्कम दिली जाते. पण खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी बीसीसीआयकडूनही रोख रकमेची घोषणा केली जाते. याआधी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील विजयानंतर आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील विजयानंतरही भारतीय संघासाठी बीसीसीआयकडून रोख रक्कम जाहीर करण्यात आली होती. पण यावेळी बक्षिसाची रक्कम मोठी आहे. कारण भारतीय संघाने जे करून दाखवलं आहे, ते याआधी कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघासाठी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसाठी तब्बल १३१ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला एकतर्फी पराभूत केलं. हा सामना भारताने ९६ धावांनी आपल्या नावावर केला. याआधी २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी भारतीय संघाने आपलं जेतेपद राखलं आहे. कुठल्याही संघाला लागोपाठ २ वेळा टी-२० वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. त्यामुळे लागोपाठ २ वेळा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे.
यासह भारतीय संघाने आणखी मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. याआधी कुठल्याही संघाला मायदेशात खेळताना जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आली नव्हती. पण भारतीय संघाने हे करून दाखवलं आहे. हे भारतीय संघाचं तिसरं जेतेपद ठरलं आहे. यासह तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे. या दमदार कामगिरीसह भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. या कया ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीसीसीआयने सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन केले आहे आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
