न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा २८व र्षीय भरत इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.

हेही वाचा – PAK vs AUS : ड्रेसिंग रुममध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराचा खेळाडूंना इशारा; म्हणाला, “जर असं करताना कोणी दिसलं…”

न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटीसोबत तीन टी-२० सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. करोनामुळे आयपीएल आणि वर्ल्डकपचे आयोजनही यूएईत करावे लागले. दुसरीकडे पाकिस्तान आणि न्यूझीलंडने पराभूत केल्याने भारताचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करत हिशोब चुकता करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

या दौऱ्यापूर्वी बीसीसीआय नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोर फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोर त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल.

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी सामने

  • पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announced team india squad for test series against new zealand adn
First published on: 12-11-2021 at 12:52 IST