BCCI Announces Prize Money for U19 WC Team: भारताच्या अंडर-१९ संघाने २०२६च्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली युवा टीम इंडियाने स्पर्धेत अपराजित राहत ट्रॉफी आपल्या नावे केली. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा तब्बल १०० धावांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. यासह भारताने विक्रमी सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरलं. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी कोट्यवधींची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या ८० चेंडूत १७५ धावांच्या खेळीच्या बळावर ४११ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या इतर फलंदाजांनीही महत्त्वाचं योगदान दिलं. तर गोलंदाजीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही आणि सामना १०० धावांनी जिंकला.

२०२६ चा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्याबद्दल बीसीसीआयने भारताच्या अंडर-१९ संघाला ७.५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, “२०२६ चा अंडर-१९ विश्वचषक जिंकल्याबद्दल संपूर्ण देश आणि बीसीसीआयला आमच्या अंडर-१९ संघाचा अभिमान आहे. आमच्या संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला ज्या पद्धतीने हरवलं आणि स्पर्धेत ते ज्या प्रकारे अपराजित राहिले त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. बीसीसीआय संघाला ७.५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करेल.”

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंडर-१९ संघाचे विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केलं होतं, “भारताच्या प्रतिभावान क्रिकेटपटूंची चमकदार कामगिरी! विश्वचषक मायदेशी आणल्याबद्दल अंडर-१९ संघाचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत संघ खूप छान खेळला, अपवादात्मक कौशल्य दाखवलं. या विजयामुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल. आम्ही खेळाडूंना त्यांच्या आगामी जीवनासाठी शुभेच्छा देतो.”

भारतीय अंडर-१९ संघाने २०२६ चा आयसीसी अंडर-१९ विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात इंग्लंड अंडर-१९ संघाचा १०० धावांनी पराभव केला आणि झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये त्यांचे सहावे विजेतेपद पटकावले.

आयसीसीच्या धोरणानुसार, विजयी भारतीय संघाला बक्षीस दिलं नाही. परंतु बीसीसीआयने, प्रत्येक स्तरावर विश्वविजेत्या संघाचा सन्मान करण्याची परंपरा बीसीसीआयने सुरू ठेवली. १९ वर्षांखालील संघाला बीसीसीआयने दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. यापूर्वी, २०२५ मध्ये १९ वर्षांखालील महिला विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचे बक्षीस दिलं होतं.