IPL 2026 Schedule Changes Marathi news: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या १९व्या हंगामाच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. सुरूवातीला आयपीएलच्या वेळापत्रकाचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी बीसीसीआयकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. आता या वेळापत्रकात बीसीसीआय़ने कोणते दोन बदल केले आहेत, जाणून घेऊया.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या बदलानुसार, २६ एप्रिलला जो सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता, तो आता २१ मे रोजी खेळवला जाईल. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या बदलाचे कारण २६ एप्रिल २०२६ रोजी अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर भागांमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका असल्याचं सांगितलं.

बीसीसीआयने यापूर्वी जाहीर केलेल्या आयपीएल २०२६ च्या अधिकृत वेळापत्रकानुसार, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना २६ एप्रिलला दुपारी ३:३० वाजता अहमदाबादमधील स्टेडियमवर खेळवला जाणार होता. आता हा सामना २६ एप्रिलला चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सायंकाळी ३:३० वाजता खेळवला जाईल.

मागील वेळापत्रकानुसार, या हंगामातील दोन्ही संघांमधील दुसरा सामना आता २१ मे रोजी गुजरातच्या अहमदाबाद स्टेडियममध्ये सायंकाळी ७:३० वाजता होईल. जेव्हा बीसीसीआयने यापूर्वी आयपीएल २०२६ हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले होते, तेव्हा त्यात पहिल्या २० सामन्यांचा तपशील समाविष्ट होता. निवडणूक आयोगाने विविध राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर, बीसीसीआयने हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी त्यांच्या आयपीएल २०२६ च्या मोहिमेची फारशी चांगली सुरूवात पाहायला मिळालेली नाही. गुजरात टायटन्सने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यात दोनच सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघाने या हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले असून, त्यापैकी पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यानंतर चौथ्या सामन्यात अखेरीस चेन्नईने विजयाचं खातं उघडलं. यासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. संघाला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर त्यांना उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे.