BCCI’s Anti-Corruption unit flags presence of unauthorised persons in IPL dugout: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीयू) आयपीएलदरम्यान संघांच्या डगआउटमध्ये अनधिकृत व्यक्तींची उपस्थिती आढळल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, सार्वजनिकरित्या समोर न आलेल्या आणखी काही नियमभंगाच्या घटनाही निदर्शनास आल्याचं सांगितलं जात आहे. यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचं वक्तव्य सध्या समोर आलं आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आठवड्याच्या शेवटी बैठक बोलावली आहे. नियम आणि प्रोटोकॉलची पुन्हा आठवण करून देतानाच, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संघांवर आणि संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई करण्याबाबतही चर्चा होणार आहे.

IPL संघाच्या डगआउटमधील ‘अनधिकृत’ वावरावर भ्रष्टाचारविरोधी विभागाची नजर

“काही परवानगी नसलेले व्यक्ती संघाच्या बसमध्ये, हॉटेलमध्ये आणि अगदी डगआउट परिसरातही दिसून आल्या आहेत. काही लोक अशा ठिकाणी आढळले जिथे त्यांना परवानगीच नव्हती.” असं बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.

“आजकाल लोक खूपच निष्काळजी होत चालले आहेत. आम्ही त्यांना असं वागू देणार नाही. नियमभंग झाल्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही, याची आम्ही पुन्हा आठवण करून देत आहोत. कुणालाही माफी मिळणार नाही,” असा इशाराही सैकिया यांनी दिला.

देवजित सैकिया यांनी सांगितलं की, भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून त्यांना महत्त्वाची माहिती मिळाली होती. “एसीयू अतिशय सक्रिय, तत्पर आणि व्यावसायिक पद्धतीने काम करत आहे,” असं त्यांनी म्हटलं. निवृत्त आयपीएस अधिकारी शरद कुमार यांच्या नेतृत्वाखालील या विभागाने अधिकृतरीत्या समोर आलेल्या दोन घटनांपलीकडील माहितीही दिल्याचं सैकिया यांनी स्पष्ट केलं.

बीसीसीआयने अधिकृतपणे मान्य केलेल्या दोन्ही घटना राजस्थान रॉयल्सशी संबंधित आहेत. पहिल्या प्रकरणात संघ व्यवस्थापकाने डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे त्यांना समज देण्यात आली होती, कारण ते नियमांच्या विरोधात होतं. त्यानंतर संघाचा कर्णधार रियान पराग याचा ड्रेसिंग रूममधील व्हेपिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये व्यवस्थापक आणि कर्णधाराचं म्हणणं ऐकल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

रियान पराग व्हेपिंग प्रकरण अद्याप सुरू – देवजीत सैकियांचं वक्तव्य

व्हेपिंग प्रकरणातील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसून, यामध्ये आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. “व्हेपिंग प्रकरण अजूनही सुरू आहे आणि त्यात पुढील कारवाई केली जाऊ शकते. आम्ही काहीही दुर्लक्ष करून बसलेलो नाही. आयपीएल किंवा बीसीसीआयच्या कोणत्याही सामन्यात अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, हे सर्वांनी लक्षात ठेवावं,” असा इशारा देवजित सैकिया यांनी दिला.

यापूर्वीही संघांच्या डगआउटमध्ये प्रवेश असलेल्या व्यक्तींनी गंभीर गैरप्रकार केल्याची उदाहरणं समोर आली आहेत. २०१३ च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी गुरुनाथ मेय्यप्पन हा तत्कालीन बीसीसीआय प्रमुख आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई होता. चौकशीत मेय्यप्पन दोषी आढळला होता. त्याच्यावर बेकायदेशीर सट्टेबाजी आणि बुकींना अंतर्गत माहिती पुरवल्याचे आरोप सिद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्यावर क्रिकेटशी संबंधित सर्व प्रकारच्या उपक्रमांमधून आजीवन बंदी घालण्यात आली. मेय्यप्पन हा चेन्नई सुपर किंग्जच्या डगआउटमध्ये नियमितपणे दिसत असे, त्यामुळे त्या काळात या प्रकरणाने मोठा वाद निर्माण झाला होता.