BCCI Took Action On Romi Bhinder: काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे संघ व्यवस्थापक रोमी भिंडर लाईव्ह सामन्यादरम्यान मोबाईलचा वापर करताना दिसून आले होते. वैभव सूर्यवंशीच्या बाजूला बसून लाईव्ह सामन्यादरम्यान मोबाईलचा वापर करणं हे त्यांना चांगलंच भोवलं आहे. हे आयपीएलच्या नियमांच्या विरुद्ध असल्याने बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली आहे. बीसीसीआयने त्यांच्यावर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती.
आयपीएलचे काही नियम असतात त्यानुसार खेळाडूंना मोबाईल वापरण्यावर बंदी असते. प्लेअर्स अँड मॅच ऑफिशियल प्रोटोकॉलमध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलं आहे की, संघ व्यवस्थापक मोबाईलचा वापर करू शकतात, पण डगआऊटमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. संघ व्यवस्थापक मोबाईलचा वापर केवळ ड्रेसिंग रुममध्ये करू शकतात. पण रोमी भिंडर हे राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना सुरू असताना डगआऊटमध्ये बसून मोबाईलचा वापर करताना दिसून आले. त्यावेळी वैभव सूर्यवंशी त्याच्या बाजूला बसला होता.
रोमी भिंडर हे राजस्थान रॉयल्स संघाचे संघ व्यवस्थापक असण्यासह वैभव सूर्यवंशीचे संरक्षक देखील आहेत. वैभव सूर्यवंशीबाबत अनेक निर्णय घेण्यामागे रोमी भिंडर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
रोमी भिंडर यांना आपली बाजू मांडण्यासाठी ४८ तासांचा वेळ दिला गेला होता. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमी भिंडर यांनी जी उत्तरं दिली त्यावरून बीसीसीआयचे भ्रष्ट्राचार विरोधी पथक सहमत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासह त्यांना अधिकृतरित्या चेतावणी देखील देण्यात आली आहे.
राजस्थान रॉयल्सची दमदार कामगिरी
यावेळी राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली आहे. रियान पराग पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यादरम्यान ४ सामने जिंकले आहेत. तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ८ गुणांसह राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.
