येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी २० क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) खेळाडूंच्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची काळजी घेताना दिसत आहे. विश्वचषकापूर्वी खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी बीसीसीआयने ‘मेंटल कंडिशनिंग कोच’ची नियुक्ती केली आहे. प्रसिद्ध मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांच्यासोबत बीसीसीआयने अल्पकालीन करार केला आहे.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून सर्व खेळाडू पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आहेत. नियुक्ती झाल्यानंतर पॅडी अप्टन तत्काळ भारतीय संघात सामील झाले आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघाचा भाग असतील. आपल्या नियुक्तीबाबत पॅडी अतिशय आनंदी असल्याचे दिसते आहे. पॅडी अप्टन यांनी ट्वीट केले की, “भारतीय संघात परत आल्याने आणि माझा दीर्घकाळचा साथीदार, मित्र आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटत आहे. राजस्थान रॉयल्ससाठी आम्ही दोघांनी एकत्र काम केले होते.”

२००८ मध्ये माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हाच पॅडी अप्टनदेखील भारतीय संघाशी जोडले गेले होते. या दोघांनी २०११ पर्यंत यशस्वीपणे भारतीय संघाला प्रशिक्षण दिले होते. दोघांच्या कार्यकाळात भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्यानंतर राहुल द्रविड आणि पॅडी अप्टन यांनी मिळून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी काम केले होते.

हेही वाचा – रोहित शर्मा अन् गँगने मिळून केली युझवेंद्र चहलची चेष्टा; इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अचानक झाली धोनीची एंट्री

टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. अशा परिस्थितीत द्रविडला कदाचित अशा एखाद्या व्यक्तीची गरज भासेल जी खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी मदत करेल. पॅडी अप्टन यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंना मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे त्यांना खेळाडूंच्या मानसिक स्थितीचा अंदाज आहे.