आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने एन. श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’ दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आता १७ डिसेंबरला चेन्नईत होणार आहे.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबरला होणार होती, पण कार्यकारी समितीने तातडीने बोलावलेल्या बैठकीत ही सभा १७ डिसेंबरला चेन्नईत पार्क शेरेटन येथे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर कार्यकारी समितीने आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांनाही पाठिंबा दर्शवला आहे. ‘‘श्रीनिवासन यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे बीसीसीआयचे कामकाज अस्थिर झाले होते. पण या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नव्हते, हे मुदगल समितीच्या अंतिम अहवालानंतर स्पष्ट झाले आहे,’’ असे बीसीसीआयच्या पत्रकात म्हटले आहे.
मुदगल समितीने अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला असून या प्रकरणाच्या सुनावणीला २४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ‘‘बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांना अंतिम अहवालाची प्रत देण्यात आली आहे. त्याचबरोबर अहवालातील निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली. या अहवालातील आरोपांबाबत सुंदर रामन यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याचे कार्यकारी समितीने ठरवले आहे,’’ असेही पत्रकात म्हटले आहे.