BCCI Bans Rohit Yadav Age Fraud: भारतीय अंडर-१९ संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या १९-खालील संघाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय सामने आणि ‘युथ टेस्ट’ मालिका खेळवल्या जाणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या रोहित यादववर बीसीसीआयने (BCCI) बंदी घातली आहे. त्याच्याबरोबर इतर ६२ खेळाडूंवरही कारवाई करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं पाहूया.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाल्यानंतर काही आठवड्यांतच बंगालचा लेगस्पिनर रोहित यादववर BCCIने दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा मूळ रहिवासी असलेल्या रोहितने जुलैमध्ये भारतीय १९ वर्षांखालील संघासोबत श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यात त्याने सहा विकेट्स घेतल्या आणि संघाला अखेरचा कसोटी सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

BCCIच्या एका सूत्राने सांगितलं, “त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.” रोहितची ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्ध राजकोट आणि अहमदाबाद येथे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या भारताच्या अंडर-१९ घरच्या वनडे आणि मल्टी-डे सामन्यांसाठीही निवड झाली होती. मात्र, श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करताना वयाबाबत विसंगती समोर आली. रोहितकडे जन्मवर्ष वेगवेगळं दाखवणारी तीन जन्म प्रमाणपत्रं असल्याचं समोर आलं, २००७, २००९ आणि २०१०. त्यामुळे वयोगटाच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी तो अपात्र ठरला.

रोहित यादवच्या आधार कार्डच्या नोंदींमध्येही वयाबाबत विसंगती आढळून आली. बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे (CAB) नोंदणी करताना त्याचं जन्मवर्ष २००७ नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर आधारच्या नोंदींमध्ये २०१७ आणि २०२०मध्ये करण्यात आलेल्या अपडेट्समध्ये जन्मवर्ष २००६ दाखवण्यात आलं. मात्र, २०२१मध्ये ते बदलून २००९ करण्यात आलं. या विसंगतींमुळे CABने यापूर्वीच रोहितला आपल्या कनिष्ठ संघांमधून दूर ठेवलं होतं आणि याबाबत BCCIलाही माहिती दिली होती.

आता BCCIने त्याच्यावर दोन वर्षांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची बंदी घातली असून, या निर्णयाची माहिती सर्व संलग्न राज्य क्रिकेट संघटनांना देण्यात आली आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून ६२ खेळाडूंवर कारवाई

रोहित यादव हा अशा ६२ खेळाडूंमध्ये आहे, ज्यांना कागदपत्रं आणि वयासंबंधीच्या विसंगतींमुळे CABने २०२६-२७ आणि २०२७-२८ हंगामात कोणत्याही स्पर्धेसाठी नोंदणी किंवा ट्रान्सफर करण्यास अपात्र ठरवलं आहे. या यादीत भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा माजी सदस्य रवी कुमार आणि डावखुरा फिरकी अष्टपैलू विशाल भट्टी यांचाही समावेश आहे. विशालने आतापर्यंत तीन फर्स्ट-क्लास आणि दोन लिस्ट-ए सामने खेळले आहेत.

२०२२च्या भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या रवी कुमारच्या CABच्या नोंदींमध्ये जन्मतारखेच्या बाबतीत ४५ महिन्यांची तफावत आढळली आहे. CABने वयोगटातील इतर अनेक खेळाडूंच्या कागदपत्रांमध्येही मोठ्या विसंगती शोधून काढल्या आहेत. काही खेळाडूंच्या नोंदींमध्ये जन्मवर्षाच्या बाबतीत कित्येक वर्षांचा फरक आढळून आला आहे. खेळाडूंची कागदपत्रं आणि वयाच्या नोंदींची पडताळणी करण्याचा CABचा हा एक भाग आहे. या प्रक्रियेशी संबंधित माहिती आणि नोंदी संघटनेने आपल्या वेबसाइटवरही अपलोड केल्या आहेत.