BCCI on Vaibhav Sooryavanshi Debut: १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी पदार्पण कधी करणार, यावर सध्या सर्वांच्या नजरा आहेत. इंग्लंड मालिकेसाठी वैभवची निवड झाली असली तरी त्याला पदार्पणाची संधी अद्याप मिळालेली नाही. जगातील अव्वल गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्याने क्रिकेटविश्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड होताच तो भारताकडून आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. मात्र पदार्पणासाठी त्याला आता बरीच वाट पाहावी लागत आहे. दरम्यान चाहते, क्रिकेटमधील जाणकार भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या मुद्द्यावर आता बीसीसीआयने वक्तव्य केलं आहे.

वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड झाल्यापासून संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि या तिन्ही सामन्यांत त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. प्रत्येक सामना सरत असताना वैभवला पदार्पणाची संधी द्यावी, अशी मागणी अधिक जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रथमच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स नाऊला दिलेल्या विशेष मुलाखतीत शुक्ला यांनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचं समर्थन केलं. वैभवची भारतीय संघात झालेली निवड ही त्याच्या गुणवत्तेवर असलेल्या विश्वासाची पावती असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच प्रशिक्षक आणि निवड समितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करत त्यांनी सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनावर होत असलेल्या टीका आणि राजकीय स्वरूपाच्या प्रतिक्रियांवरही नाराजी व्यक्त केली. वैभवला योग्य वेळी नक्कीच संधी मिळेल, मात्र तो नेमका कधी खेळणार याचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे संघ व्यवस्थापनाकडेच असल्याचं शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

राजीव शुक्ला वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबद्दल काय म्हणाले?

“वैभव सूर्यवंशी हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आयपीएलमध्ये त्याने आपल्या कामगिरीतून ते सिद्धही करून दाखवलं आहे. मात्र, संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांवर होत असलेल्या टीका पाहून मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. अंतिम निर्णय हा प्रशिक्षक आणि कर्णधारच घेणार आहेत. ते प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर वैभवला नक्कीच संधी देतील,” असं राजीव शुक्ला यांनी बोलताना सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “अशा प्रकारचे निर्णय संघ व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीवर सोडले पाहिजेत. याबाबत विनाकारण टीका किंवा अनावश्यक टिप्पणी का केली जात आहे, हे मला समजत नाही.”

२०२६च्या टी-२० विश्वचषक विजयात इशान किशन, संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांसारख्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे एखाद-दुसऱ्या सामन्यात त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तरीही संघ व्यवस्थापनाचा त्यांच्यावरील विश्वास आणि ते दीर्घकालीन नियोजनाचा भाग कायम आहेत. त्यामुळे गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत उभारलेली संघरचना, तयार केलेली प्रणाली आणि संघाची क्रमवारी एका खेळाडूसाठी बदलण्याची घाई न करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.