IPL Opening Ceremony: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ बलाढ्य सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण या सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधी ओपनिंग सेरेमनीत कुठलाही धुमधडाका किंवा जल्लोष केला जाणार नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आपलं पहिलं जेतेपद मिळवण्यासाठी १८ वर्ष वाट पाहावी लागली. आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जला पराभूत करून पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. त्यामुळे खेळाडू दुसऱ्याच दिवशी अहमदाबादहून बंगळुरूत दाखल झाले होते. पण हा ऐतिहासिक दिवस बंगळुरू संघासाठी ब्लॅक डे ठरला. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी चिन्नास्वामी मैदानात हजारोंच्या संख्येने गर्दी केली. तर मैदानाबाहेर त्याहून जास्त लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ११ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ज्यात १४ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता.

या घटनेत जीव गमावलेल्या ११ पीडितांप्रती संवेदनशीलता, आठवण आणि आदर व्यक्त करण्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण यावेळी कुठल्याही कार्यक्रमाशिवाय आरसीबी विरूद्ध हैदराबाद सामन्याची सुरूवात केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “गेल्या वर्षी ४ जूनला घडलेल्या दु:खद घटनेमुळे आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही. आयपीएलच्या सुरूवातीला कुठल्याही सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही.” तर स्पर्धेतील अंतिम सामन्यावेळी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती देवजित सैकिया यांनी दिली आहे.