Vaibhav Sooryavanshi BCCI Indian Selection Committee: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये धुमाकूळ घातला. भारतीय क्रिकेटमध्ये अवघ्या १५ वर्षांच्या वयात अशी वादळी कामगिरी करणारा खेळाडू क्वचितच पाहायला मिळाला असेल. आयपीएल २०२६ मध्ये आपल्या वादळी फलंदाजीने अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे बीसीसीआयचे आता पूर्ण लक्ष लागलं आहे. त्याच्या कामगिरीने केवळ क्रिकेट चाहत्यांनाच चकित केले नाही, तर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रभावित केलं आहे. यामुळेच निवड समितीवर आता वैभवबाबत एक मोठा निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीला आता बीसीसीआयकडून विशिष्ट सूचना मिळाल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय संघाची निवड करणाऱ्या अजित आगरकर आणि त्यांच्या टीमला वैभव सूर्यवंशीसाठी जे काही आवश्यक असेल ते करण्याचे निर्देश दिले आहेत.

वैभव सूर्यवंशीबद्दल BCCIचे सचिव देवजीत सैकिया काय म्हणाले?

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सैकिया म्हणाले, “वैभव हा भारतीय क्रिकेटमधील नवा ‘वंडर बॉय’ आहे. येत्या काळात तो जागतिक क्रिकेटमध्येही धुमाकूळ घालेल, याची मला खात्री आहे. आयपीएल स्पर्धेत सर्व निवड समिती सदस्य बारकाईने सामने पाहत असतात. बहुतेक वेळा ते मैदानावरही उपस्थित असतात. त्यामुळे भारताच्या आगामी युरोप दौऱ्यासाठी (आयर्लंड व इंग्लंड दौरा) संघ निवडताना त्याच्या कामगिरीचा नक्कीच विचार केला जाईल. वैभवने ज्या पद्धतीने आयपीएलमध्ये फलंदाजी केली आहे, त्यानुसार त्याच्या हिताचा आणि भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने योग्य तो निर्णय निवड समिती नक्कीच घेईल.”

कर्णधार आणि भारतीय निवड समितीसोबतच, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया हे देखील टीम इंडियाच्या निवड बैठकांना उपस्थित असतात. त्यामुळे, त्यांच्या वक्तव्याकडे भारतीय निवड समितीला दिलेला एक निर्देश म्हणून पाहिले जात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे.

क्रिकेटमधील दिग्गजही वैभव सूर्यवंशीच्या खेळाचे कौतुक करत आहेत. त्यांच्या मते, वैभव भारतीय संघाकडून खेळायला तयार आहे. या क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजय जडेजा, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.

वैभवला आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता

भारत २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर संघ पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करेल. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या सुमारास युरोप दौऱ्यासाठी संघाची घोषणा करेल. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, इतक्या लहान वयात वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश केला जाईल का, की त्याचे वय लक्षात घेता निवड समिती आणखी काही काळ थांबेल, यावर सर्वांच्या नजरा आहेत.