जयपूर : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे प्रशिक्षक म्हणून असलेले योगदान मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उठून दिसत असले, तरी कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यातील पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रशिक्षकाच्या पर्यायाचा गंभीरपणे विचार करू लागले आहे.
‘बीसीसीआय’कडून मिळालेल्या माहितीनुसार एका पदाधिकाऱ्याने व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्याशी संपर्क देखील साधला असल्याचे समजते. मात्र, आपण सर्वोच्च केंद्रातील (सेंटर ऑफ एक्सलन्स) भूमिकेत समाधानी असल्याचे लक्ष्मणने म्हटले असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
गंभीर यांच्याबरोबरचा करार २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषकपर्यंतचा आहे. मात्र, आता ‘बीसीसीआय’कडून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीनुसार त्यांच्या कराराचा फेरविचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, भारतीय क्रिकेटच्या सत्ताकेंद्रात गंभीरला जोरदार पाठिंबा आहे. ‘बीसीसीआय’च्या वर्तुळातूनच अजून गंभीर जागतिक कसोटी मालिकेतील उर्वरित नऊ सामन्यांसाठी योग्य आहे की नाही यावर एकमत झालेले नाही.
भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली किंवा अंतिम फेरीत प्रवेश केला तर, गंभीर यांचे प्रशिक्षकपद टिकू शकते, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिने ‘आयपीएल’ स्पर्धा सुरू राहणार असल्यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी एकच की वेगवेगळे प्रशिक्षक याबाबत विचार करण्यासाठी ‘बीसीसीआय’कडे पुरेसा वेळ असेल, असे मानले जात आहे.
