पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या केंद्रीय वार्षिक करारातून ‘अ-प्लस’ श्रेणी वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आता ‘अ’ श्रेणी सर्वोच्च ठरणार असून यात क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत खेळणाऱ्या खेळाडूंना स्थान मिळणे अपेक्षित आहे. याआधी ‘अ-प्लस’ श्रेणीत असणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तारांकित खेळाडू आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत असल्याने त्यांचा ‘ब’ श्रेणीत समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या धोरणानुसार, ‘अ-प्लस’ श्रेणीतील क्रिकेटपटूला वार्षिक ७ कोटी रुपये, ‘अ’ श्रेणीतील खेळाडूला ५ कोटी रुपये, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूला ३ कोटी रुपये आणि ‘क’ श्रेणीतील खेळाडूला १ कोटी रुपये दिले जातात. ‘बीसीसीआय’ने २०२५-२६ हंगामासाठी अद्याप वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. मात्र, त्यात खेळाडूंना ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तीनच श्रेणीत विभागले जाईल असे समजते. ‘अ-प्लस’ श्रेणी सर्वप्रथम २०१८ मध्ये आणली गेली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकांची समिती ‘बीसीसीआय’चा कारभार सांभाळत होती.

बुमरा सर्वोच्च श्रेणीतच

गेल्या केंद्रीय करारात ‘अ-प्लस’ श्रेणीत रोहित, विराट, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश होता. यापैकी रोहित आणि विराट यांनी कसोटी व ट्वेन्टी-२०, तर जडेजाने ट्वेन्टी-२० प्रारूपातून निवृत्ती घेतली आहे. केवळ बुमराच तीनही प्रारूपांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे बुमराचे सर्वोच्च श्रेणीतील स्थान कायम राहणार आहे. बुमराप्रमाणेच शुभमन गिलही ‘अ’ श्रेणीत असेल. गिल कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करतो. आता ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही या श्रेणीसाठी विचार केला जाईल. कार्यकारी परिषदेच्या पुढील बैठकीत या बदलांवर शिक्कामोर्तब होईल.