BCCI Fines TNPL Player Dugout Mobile Protocol Violation: जगभरात टी-२० लीग्सच्या वाढत्या प्रसारामुळे मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा धोका सतत कायम असतो. भारतातही, बुकी अशा राज्य-स्तरीय लीग्समध्ये संधी शोधत असतात. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. बीसीसीआयने (BCCI) ‘तमिळनाडू प्रीमियर लीग’ (TNPL) मध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूवर अशीच कारवाई केली आहे; सामन्यादरम्यान मोबाईल फोन वापरताना आढळल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

तमिळनाडूच्या एका क्रिकेटपटूला नुकत्याच झालेल्या तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) सामन्यादरम्यान डगआउटमधून गर्लफ्रेंडला मेसेज केल्याप्रकरणी BCCIच्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने (ACSU) १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अँटी करप्शन नियमांनुसार, सामना सुरू असताना खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांसाठी राखीव असलेल्या Players and Match Officials Area (PMOA) मध्ये मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे या क्रिकेटपटूने मोबाईल वापरून नियमांचा भंग केल्याचं मानलं गेलं.

या प्रकरणात तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA) संबंधित खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा विचार करत होती. मात्र, हा नियमभंग गंभीर स्वरूपाचा नसल्याने अखेर बंदीचा निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती PTIने दिली आहे.

TNPL अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने खेळाडूचं नाव जाहीर केलं जाणार नसल्याचं TNCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र, संबंधित क्रिकेटपटू डावखुरा फलंदाज असून गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीत तमिळनाडूकडून दोन अर्धशतकं झळकावली होती, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादरम्यान तो आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज करताना आढळला. “त्याच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत. मात्र, सामना सुरू असताना PMOAमध्ये मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नाही. त्यामुळे हा प्रोटोकॉलचा भंग आहे,” असं तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

PMOAच्या नियमांनुसार मोबाईल फोनच्या वापराबाबत कडक नियम आहेत. डगआउटमध्ये मोबाईल वापरण्यास परवानगी नसते, तर ड्रेसिंग रूममध्ये केवळ संघ व्यवस्थापकांना मोबाईल वापरण्याची मुभा असते. सामना स्थळी पोहोचल्यानंतर खेळाडू आणि बहुतांश सपोर्ट स्टाफला आपापले मोबाईल बंद करून ते जमा करावे लागतात. तसेच, ठरावीक ठिकाणी ठेवलेल्या संगणकाचा वापर केवळ सामन्याशी संबंधित माहिती पाहण्यासाठी नियुक्त विश्लेषकाला करता येतो. यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांनाही २०२६च्या आयपीएलदरम्यान डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.