Devjit Saikia On Asia Cup Trophy Controversy: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने ७२ धावांनी दमदार विजयाची नोंद केली. आठव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर ट्रॉफीवरून चांगलाच वाद रंगला. ACC प्रमुख मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर आले, पण भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला आणि मैदान सोडलं.
आशिया चषक आणि ट्रॉफी हे काही नवीन समीकरण नाही. याआधी २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यावेळी देखील मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर आले होते. पण भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी घेण्यास नकार दिला आणि ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केलं. बीसीसीआयने मोहसीन नक्वींना आधीच सांगितलं होतं की, जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ट्रॉफी नक्वींच्या हातून घेतली जाणार नाही. असं सांगूनही, ते विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर गेले.
बीसीसीआयने दिले होते २ पर्याय
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, भारतीय संघ आधीपासूनच मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात होता. बीसीसीआयने आधीच त्यांना हे सांगितलं होतं. त्यांना २ पर्याय देण्यात आले होते. पहिला पर्याय हा होता की, ACC चे डेप्युटी चेअरमन खालिद अली जरूनी भारतीय संघाला ट्रॉफी देतील. तर दुसरा पर्याय असा होता की, विजेत्या संघाच्या कुठल्याही प्रतिनिधिने भारतीय संघाला ट्रॉफी द्यावी. पण नक्वींनी हे दोन्ही पर्याय धुडकावून लावले आणि स्वत: ट्रॉफी देण्यासाठी पुढे आले.
देवजीत सैकीया काय म्हणाले?
देवजीत सैकिया यांनी मुलाखतीत सांगितले की, “प्रत्येक भारतीय खेळाडू आणि देशवासीयांसाठी आधी देश खूप महत्वाचा आहे. संपूर्ण देशवासीयांना हेच वाटतं की, जो व्यक्ती आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषा करतो, त्याच्या हातून ट्रॉफी कशी घेणार? त्यामुळेच पुरुष संघ जिंकला तेव्हा आणि महिला संघ जिंकल्यानंतरही भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला आहे.”
