BCCI Pension Announcement : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या सर्व माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, "आपल्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. खेळाडू हे क्रिकेट बोर्डासाठी एखाद्या जीवनरेखेप्रमाणे असतात. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांची काळजी घेणे ही बोर्डाची जबाबदारी आहे. पंच हे 'अनसंग' हिरोसारखे असतात. त्यांच्या योगदानाची बीसीसीआयला जाणीव आहे." ज्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंना आतापर्यंत ३० हजार रुपये मिळत होते, त्यांना आता ५२ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. याशिवाय २००३ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि २२ हजार ५०० रुपये निवृत्ती वेतन मिळणाऱ्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आता ४५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून मिळणारी कमाई भविष्यात खेळाडूंच्या सुविधा आणि गरजांवरही वापरली जाऊ शकते, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. दरम्यान, आयपीएल माध्यम हक्कांच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बीसीसीआयने सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईचा वापर म्हणून बीसीसीआयने आपल्या माजी महिला व पुरुष क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या मासिक निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्या माजी कसोटीपटूंना ३७ हजार ५०० रुपये मिळत होते त्यांना आता ६० हजार रुपये मिळणार आहेत. तर, ज्यांना ५० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत होते त्यांना आता ७० हजार रुपये दिले जाणार आहेत.