बंगळूरु : आगामी २०२६-२७ देशांतर्गत हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळण्याच्या नियमांत मोठे बदल जाहीर केले आहेत. आता एखाद्या गोलंदाजाने जाणीवपूर्वक फ्रंट-फूट नो-बॉल किंवा धोकादायक बीमर टाकला, तर त्याच्यावर थेट संपूर्ण सामन्यासाठी बंदी घातली जाईल. यासह मॅच फिक्सिंग (सामनानिश्चिती) आणि संशयास्पद निकाल रोखण्यासाठी शेवटच्या डावात ‘डाव घोषित’ करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वीच्या नियमांनुसार, अशा प्रकारच्या चेंडूंसाठी संबंधित गोलंदाजाला केवळ त्या विशिष्ट डावापुरतेच गोलंदाजी करण्यापासून रोखले जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची नियमावली करणार्या मेरिलेबोन क्रिकेट क्लबने या नियमांमध्ये नुकत्याच सुचवलेल्या सुधारणा ‘बीसीसीआय’ने स्वीकारल्या असून, त्यानुसार हे नियम बदल करण्यात आले आहे. हे सर्व बदलते नियम सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पाठविण्यात आले आहेत.
मुद्दामहून नो-बॉल टाकल्याबद्दल निलंबित झालेला गोलंदाज संपूर्ण सामन्यात पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. मात्र, नियमावलीच्या (४१.८) अंतर्गत हा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार मैदानातील पंचांचे असतील, असे ‘बीसीसीआय’ने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून दुलीप करंडक स्पर्धेने सुरू होणार्या देशांतर्गत हंगामापूर्वी राज्य संघटनांनी पंच आणि सामनाधिकार्यांना या नवीन नियमांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
दिवसाच्या समाप्तीबाबतचा महत्त्वाचा बदल
क्रिकेटमधील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, दिवसाचा खेळ संपतानाच्या शेवटच्या षटकात फलंदाज बाद झाल्यास ते षटक पूर्ण करावेच लागेल. सध्याच्या नियमानुसार, दिवसाच्या शेवटच्या षटकादरम्यान फलंदाज बाद झाल्यास तेथेच दिवसाचा खेळ थांबवला जातो. जुन्या नियम १२.५.२ मुळे संघांना दिवसाच्या शेवटी नवीन फलंदाज मैदानात पाठवण्यापासून रोखले जात होते, म्हणूनच यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
पूर्वनियोजित निकालांना लगाम
नवीन नियमांनुसार, संघांना आता सामन्याच्या शेवटच्या डावात ‘डाव घोषित’ किंवा ‘डाव सोडून’ देता येणार नाही. पूर्वनियोजित किंवा संशयास्पद निकाल लावण्यासाठी या नियमाचा गैरवापर केला जात असल्याचे आणि हे क्रिकेटच्या खेळासाठी घातक असल्याचे क्रिकेट मंडळाचे मत आहे. त्यामुळे नव्या हंगामापासून सामन्याच्या शेवटच्या डावात डाव घोषित करता येणार नाही. याबरोबरच एकदिवसीय सामन्यांमध्ये जलपानाच्या विश्रांतीला मुख्य प्रशिक्षकांना मैदानात जाऊन खेळाडूंशी चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टिरक्षकांसाठी आता चेंडू टाकण्याच्या क्षणीच आपले ग्लोव्ह्ज यष्ट्यांच्या मागे आवश्यक असतील. पूर्वी, गोलंदाजाने धाव घेण्यास (रन अप) सुरुवात केल्यापासूनच हातमोजे यष्ट्यांच्या मागे ठेवावे लागत होते. जुन्या नियमामुळे काही वेळा यष्टीरक्षणाचा चेंडू नो-बॉल ठरवला जायचा किंवा यष्टिचीत बाद दिलेले अमान्य केले जायचे.
