u भारतात सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध वनडे आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी मंगळवारी गुवाहाटीत बीसीसीआयची बैठक होणार आहे. या संघनिवडीदरम्यान अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सध्या डावखुऱ्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याच्या या पदाबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंतने गेल्या २ हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व केलं आहे. पण या दोन्ही हंगामांमध्ये लखनौचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. त्यामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली होती. दरम्यान गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान गिलच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी पंतकडे सोपवण्यात आली होती. या सामन्यात त्याने काही चुकीचे निर्णय घेतले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला ऋषभ पंतसारखा आक्रमक फलंदाज संघात हवा आहे. जो कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन आक्रमक फटकेबाजी करुन सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतो. पण अतिरिक्त जबाबदारीचा भार आल्याने तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्याने काही चुकीचे निर्णय घेतले.

ऋषभ पंतला कुठल्याही दबावाशिवाय खेळता यावं, यासाठी निवडकर्ते प्रयत्नशील असतील. पंतचा सध्याचा फॉर्म पाहता, त्याला संघात स्थान मिळणंही कठीण असल्याचं दिसून येत आहे. कारण वनडे संघाचा भाग असलेल्या केएल राहुलने आयपीएलमध्ये ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. तर बॅकअप यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली आहे.

भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध एकमात्र कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका आयपीएल झाल्यानंतर होणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह हा एकमात्र कसोटी सामना खेळताना दिसून येऊ शकतो. पण त्यानंतर वर्कलोड मॅनेज करण्यासाठी त्याला वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे आहे. अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज फलंदाज पुनरागमन करताना दिसून येतील.