काही दिवसांपूर्वी टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करणाऱ्या बीसीसीआयने ऑलिम्पिक मोहिमेसाठी तब्बल ८.५ कोटी रुपये देण्याचं ठरवलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक्सच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. 'पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना आमचा पाठिंबा असेल हे जाहीर करताना मला अत्यंत अभिमानास्पद वाटते आहे. ऑलिम्पिक मोहिमेसाठी बीसीसीआयतर्फे भारतीय ऑलिम्पिक समितीला ८.५ कोटी रुपये देण्यात येतील. पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारतीय चमूला खूप साऱ्या शुभेच्छा. देशवासीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुम्ही कराल याची खात्री वाटते', असं शहा यांनी म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ खेळाडूंचं भारतीय पथक सहभागी होणार आहे. आतापर्यंतचा हा भारतीय खेळाडूंचा सगळ्यात मोठा चमू आहे. यामध्ये ७० पुरुष तर ४७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सात पदकांची कमाई केली होती. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकावर भारतीय खेळाडूंनी नाव कोरलं होतं. यंदा ही आकडेवारी सुधारण्यासाठी भारतीय पथक सज्ज झालं आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या रकमेमुळे खेळाडूंच्या ऑलिम्पिक मोहिमेला बळकटी मिळणार आहे. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यांच्यासह मीराबाई चानू, सात्विकसैराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पदकाच्या शर्यतीत आहेत. हेही वाचा - Tennis : लिएंडर पेस आणि विजय अमितराज आंतरराष्ट्रीय ‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये सामील होणारे पहिले आशियाई खेळाडू काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांनी या खेळाडूंशी संवाद साधत त्यांना क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनुभवी टेबलटेनिसपटू शरथ कमाल आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. ऑलिम्पिकपदकविजेता माजी नेमबाज गगन नारंग हा भारतीय पथकाचं नेतृत्व करणार आहे. नुकताच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखत जेतेपदावर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताने ७ धावांनी विजय मिळवला. या जेतेपदासह भारतीय क्रिकेट संघाने १३ वर्षांचा वर्ल्डकप तर ११ वर्षांचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली पण जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. यावेळी मात्र भारतीय संघाने स्पर्धेत अपराजित राहत जेतेपदाची कमाई केली. जेतेपदाचा करंडक उचलल्यानंतर काही तासातच बीसीसीआयने विजयी संघासाठी १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. विजेत्या संघाने मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत भव्य मिरवणुकीत चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या खेळाडूंना अभिवादन केलं. यावेळी लाखो चाहते मरिन ड्राईव्ह परिसरात उपस्थित होते. यानंतर वानखेडे स्टेडियमवर संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला. यावेळी बक्षीस रकमेच्या धनादेशाने संघाला गौरवण्यात आलं होतं.