आयपीएल स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू आपल्या गर्लफ्रेंड्सबरोबर एकत्र प्रवास करताना दिसतात. इतकंच नव्हे तर टीम हॉटेलमध्येही एकत्र असतात. पण आता बीसीसीआय यावर देखील कडक निर्बंध घालणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलदरम्यान खेळाडूंना आता गर्लफ्रेंडबरोबर फिरण्याबाबत बीसीसीआय लवकरच नवी नियमावली जाहीर करणार आहे.

भ्रष्टाचाराची प्रकरणे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. काही क्रिकेटपटूंच्या जोडीदार बेटिंग ॲप्ससाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे बीसीसीआयच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढील आयपीएलपूर्वी, स्पर्धेदरम्यान क्रिकेटपटूंचं राहण्याचं ठिकाण, प्रवास आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबतच्या भेटीगाठींबाबत काही नियम निश्चित केले जातील.

रिपोर्ट्सनुसार, या विषयावर बीसीसीआयच्या पुढील बैठकीत चर्चा केली जाईल. २०२४-२५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर क्रिकेट बोर्डाने विदेश दौऱ्यांवरील पत्नी आणि कुटुंबियांसंदर्भात नियम तयार केले आहेत. मात्र, आयपीएलसाठी असे कोणतेही नियम नाहीत. या लीगमध्ये खेळाडूंच्या प्रवासाची जबाबदारी फ्रँचायझींची असते. आतापर्यंत बीसीसीआयने यासंदर्भात कोणतेही नियम जारी केलेले नाहीत. पण आता मात्र बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आहे.

रिपोर्ट्समध्ये बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, पूर्वी आयपीएल दरम्यान खेळाडूंसोबत त्यांच्या प्रेयसींना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नव्हती. मात्र, अलीकडे असं दिसून आलं आहे की अनेक खेळाडू त्यांच्या प्रेयसींसोबत प्रवास करतात आणि एकत्र राहतात. करप्शन युनिट विभागाच्या एका अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, पत्नी आणि अधिकृतपणे नोंदणीकृत प्रेयसींना एकत्र राहण्याची परवानगी आहे, परंतु याबाबत कोणतेही नियम नाहीत.

अनेक तरुण भारतीय क्रिकेटपटूंच्या प्रेयसी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. त्या त्यांच्या पेजवर विविध उत्पादने आणि कंपन्यांचा प्रचार करतात. यापैकी काही उत्पादने, जसे की बेटिंग ॲप्स, मद्य ब्रँड्स इत्यादी, बीसीसीआयच्या नियमांनुसार नाहीत. यामुळे एक चुकीचा संदेशही जातो. भारतीय संघात खेळणारा किंवा खेळण्याची इच्छा असणारा कोणताही क्रिकेटपटू अशा परिस्थितीत सापडू नये, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. असंही दिसून आलं आहे की, खेळाडू आपल्या प्रेयसींना भेटण्यासाठी काही फ्रँचायझींच्या बसेस थांबवल्या जातात, यामुळे शिस्तीचा भंगही होतो.

आयपीएल २०२६ दरम्यान, हार्दिक पांड्या महिका शर्मासोबत, अर्शदीप सिंग समरीन कौरसोबत, यशस्वी जैस्वाल मॅंडी हॅमिल्टनसोबत आणि ईशान किशन अदिती हुंडियासोबत प्रवास करताना दिसले होते. या हंगामात इतर अनेक क्रिकेटपटूदेखील त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत दिसले आहेत.