BCCI Plan for Red Ball Cricket: भारताने सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी त्यामागे कसोटी क्रिकेटमधील वाढती समस्या लपून राहिलेली नाही. संघाच्या कसोटीतील कामगिरीत लक्षणीय घसरण झाली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाची कामगिरी सुधारली असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही चिंता कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आराखडा तयार केला आहे.

गेल्या काही काळात भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्या. या पराभवांनी हे स्पष्ट केलं आहे की, भारत आता मायदेशातील परिस्थितीतही अजिंक्य राहिलेला नाही. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा आता अधिकच कमी होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटचे भविष्य मजबूत करण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखालील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) अंतर्गत विकसित करण्यात आलेली ही योजना, युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करेल.

सीओईने तयार केलेल्या या मास्टर प्लॅनचा एक भाग म्हणून, जून-जुलैमध्ये बंगळूरु येथील सीओईमध्ये एक अंतर्गत सीओई स्पर्धा आयोजित केली जाईल, ज्यामध्ये २५ वर्षांखालील ६४ अव्वल युवा क्रिकेटपटू सहभागी होतील. या स्पर्धेचा उद्देश भारतातील लाल चेंडूच्या क्रिकेटमधील प्रतिभावान खेळाडूंचा साठा मजबूत करणं आणि पुढील दशकासाठी एक भक्कम पुरवठा साखळी तयार करणं हा आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांसारख्या युवा खेळाडूंना चार दिवसीय लाल चेंडूचे सामने खेळण्याची संधी मिळेल.

सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये चार दिवसीय कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये २५ वर्षांखालील ६४ खेळाडूंना ४ संघांमध्ये विभागलं जाणार आहे. खेळाडूंना पुरेसा सराव मिळावा यासाठी हे सामने वेगवेगळ्या खेळपट्ट्यांच्या परिस्थितीत खेळले जातील. पुढील दशकभर भारतासाठी खेळू शकतील अशा लाल चेंडूच्या (कसोटी) खेळाडूंची सातत्यपूर्ण फळी तयार करणx. या बदलाचा भाग म्हणून, बेंगळुरूतील उच्च-कार्यक्षमता शिबिरांमध्ये येत्या वर्षभर लाल चेंडूच्या क्रिकेटच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

बीसीसीआय ६४ खेळाडूंची निवड कशी केली जाईल?

२५ खेळाडू (२३ वर्षांखालील): या खेळाडूंची निवड ज्युनियर निवड समितीद्वारे केली जाईल. यामध्ये कूचबिहार (१९ वर्षांखालील) आणि सीके नायडू (२२ वर्षांखालील) स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश असेल.

२५ खेळाडू (२३ वर्षांखालील आणि २५ वर्षांखालील): या खेळाडूंची निवड सिनियर निवड समितीद्वारे केली जाईल. यामध्ये रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असेल, परंतु ते आयपीएल संघाचा भाग नसतील.

१४ खेळाडू: आयपीएलमध्ये खेळणारे युवा सुपरस्टार. यामध्ये आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी आणि समीर रिझवी यांसारख्या नावांचा समावेश आहे.

स्पर्धेनंतर, इंडिया इमर्जिंग आणि इंडिया ‘अ’ संघ तयार करण्यासाठी २५ खेळाडूंचा एक मुख्य गट निवडला जाईल. हे खेळाडू देखील सराव दौऱ्यांवर जातील. बीसीसीआयच्या योजनेनुसार, आयपीएल संपल्यानंतर, इंडिया अंडर-१९ आणि इमर्जिंग (अंडर-२५) हे दोन्ही संघ श्रीलंकेचा दौरा करतील, जिथे चार दिवसीय सामने खेळले जातील.

संघाची निवड सीओई अंतर्गत स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर केली जाईल. याव्यतिरिक्त, पुढील वर्षभरात सीओई अंतर्गत आयोजित होणाऱ्या बहुतांश उच्च-कार्यक्षमता शिबिरांमध्ये लाल चेंडूच्या खेळातील प्रतिभा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. वरिष्ठ मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सहभागाने एकंदर आराखडा तयार केला जाईल.