BCCI Central Contract Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने २०२५-२६ साठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली होती. ज्यामधून एक प्लस श्रेणी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या वेतनमध्ये बदल झाला आहे. वृत्तानुसार, मंडळाने सर्वोच्च ‘ए प्लस’ श्रेणी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, कारण या श्रेणीसाठी पुरेसे पात्र खेळाडू उपलब्ध नव्हते. पण आता बीसीसीआय वेतन रचनेत सुधारणा करण्याचा विचार करत आहे. यामागचं कारण काय आहे, जाणून घेऊया.

ए प्लस श्रेणीमध्ये २०२४-२५ साठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश होता. या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. ए प्लस श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता, खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणं आणि किमान एका फॉरमॅटमध्ये अव्वल १० मध्ये स्थान मिळवणं आवश्यक आहे. आता, रोहित आणि कोहली फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतात आणि जडेजानेही टी-२० मधून निवृती जाहीर केली आहे.

या तिन्ही खेळाडूंना वगळता आता जसप्रीत बुमराह हा एकमेव उमेदवार शिल्लक होता, जो तिन्ही फॉरमॅट खेळतो. परिणामी, मंडळाने ही श्रेणी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, बुमराह आणि जडेजा यांना ‘अ’ श्रेणीत हलवण्यात आलं, जिथे खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये मिळतात. त्यामुळे बुमराहला २ कोटींचा तोटा होत असल्याची चर्चा आहे.

टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, बीसीसीआय बुमराहला २ कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई देऊ शकते. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गेल्या वर्षीइतकीच रक्कम मिळावी, हे सुनिश्चित करणं हा या बदलाचा उद्देश आहे. वृत्तानुसार, बोर्डाच्या एका सूत्राने सांगितलं, “बुमराहला मोबदला कसा द्यायचा यावर बोर्ड विचार करत आहे. त्याचे मानधन ७ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांपर्यंत कमी करणं अयोग्य ठरेल, हे समजण्यासारखं आहे. तसेच, चांगली कामगिरी करूनही काही इतर खेळाडूंचे मानांकन कमी करण्यात आले आहे. त्यांच्या करारांचे मूल्यांकन बदलू शकते.”

भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलच्या श्रेणीतही बदल होण्याची शक्यता आहे. कारण तो संघाच्या व्हाईट-बॉल संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बीसीसीआयने पूर्वी ठरवलेले निकष पूर्ण करूनही, त्याला त्याला सी श्रेणीत ठेवण्यात आलं आहे, ज्याअंतर्गत त्याला १ कोटी वेतन मिळेल. त्यामुळे या सर्व गोष्टीत आता बदल होण्याची मोठी शक्यता आहे.

गेल्या महिन्यात, बीसीसीआयने एकूण ३० खेळाडूंना केंद्रीय करारामध्ये सामील केलं. यांपैकी केवळ तीन खेळाडू ‘अ’ श्रेणीत आहेत: शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा. अकरा खेळाडू ‘ब’ श्रेणीत, तर उर्वरित ‘क’ श्रेणीत आहेत. केंद्रिय करार जाहीर केला असला तरी बीसीसीआयने नवीन करारांमधील प्रत्येक श्रेणीसाठी वेतन रचना जाहीर केलेली नाही.