वृत्तसंस्था, मुंबई
राहुल द्रविडसह माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी आणि महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ‘बीसीसीआय’चा वार्षिक ‘नमन’ पुरस्कार सोहळा आज, रविवारी नवी दिल्ली येथे होणार असून त्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचाही सत्कार केला जाणार आहे.
भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावत इतिहास घडवला. ही स्पर्धा सलग दोन वेळा आणि एकूण तीन वेळा जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. या ऐतिहासिक कामगिरीसाठी विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार केला जाणार असल्याचे ‘बीसीसीआय’कडून शनिवारी सांगण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांमधील काही नावे याआधीच समोर आली होती. वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा ‘पॉली उम्रीगर पुरस्कार’ यंदा शुभमन गिलला जाहीर झाला आहे. महिलांमध्ये हा मान सलामीची फलंदाज स्मृती मनधानाला मिळणार आहे. विशेष म्हणजे, वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरण्याची ही स्मृतीची पाचवी वेळ आहे.
माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड, तसेच १९८३च्या ऐतिहासिक विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग असणारे माजी अष्टपैलू आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना प्रतिष्ठेच्या ‘कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. १९८३ सालच्या एकदिवसीय विश्वचषकात बिन्नी यांनी सर्वाधिक बळी मिळवले होते. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य आणि प्रशासक म्हणूनही योगदान दिले.
महिलांमध्ये माजी कर्णधार मिताली राज जीवनगौरव पुरस्काराची मानकरी ठरणार आहे. मितालीची सर्वकालीन सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते. तिने क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत मिळून भारतासाठी ३०० हून अधिक सामने खेळताना १० हजारहून अधिक धावा केल्या. यात आठ शतकांचाही समावेश होता. भारतातील महिला क्रिकेटच्या प्रगतीत मितालीचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. तिच्या या कार्याची दखल घेताना ‘बीसीसीआय’कडून तिला सन्मानित केले जाणार आहे.
‘बीसीसीआय’ पुरस्कार
विजेते (निवडक)
जीवनगौरव
राहुल द्रविड, रॉजर बिन्नी,
मिताली राज
सर्वोत्तम क्रिकेटपटू
शुभमन गिल (पुरुष),
स्मृती मनधाना (महिला)
सर्वोत्तम पदार्पणवीर
हर्षित राणा (पुरुष),
श्री चरणी (महिला)
सर्वोत्तम अष्टपैलू (देशांतर्गत)
आयुष म्हात्रे, मुंबई (मर्यादित षटके)
हर्ष दुबे, विदर्भ (रणजी करंडक)
महिला क्रिकेटपटू (देशांतर्गत)
इरा जाधव, मुंबई (कनिष्ठ)
शफाली वर्मा, हरियाणा (वरिष्ठ)
सर्वोत्तम राज्य संघटना
मुंबई क्रिकेट संघटना
