BCCI New Fitness Policy Selection Criteria Indian Cricket Team: अफगाणिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. या मालिकेसाठी संघात निवड केलेले ४ खेळाडू हे दुखापतीनंतर पूर्णपणे फिट झालेले नाहीत. तरीही त्यांची टी-२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. यादरम्यान आता बीसीसीआयने दुखापत झालेल्या खेळाडूंच्या निवडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांत BCCIचं सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) दुखापतग्रस्त खेळाडूंच्या व्यवस्थापनावरून टीकेच्या केंद्रस्थानी आलं आहे. हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे, मात्र मैदानावर काही काळ खेळल्यानंतरच त्यांना दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आता BCCIने एखाद्या खेळाडूच्या फिटनेसबाबत व्यवस्थापनाला पूर्ण खात्री असल्याशिवाय त्यांची संघात निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितलं, “केवळ १०० टक्केच नाही, तर एखादा खेळाडू उपलब्ध असेल याबाबत २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याला संघात घेण्याचा निर्णय घेतला जाईल.”
दुखापतग्रस्त खेळाडूंना घाईघाईने संघात घेतल्यामुळे अलीकडच्या काळात BCCIवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर बोर्डाने खेळाडूंच्या निवडीसंदर्भात आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केल्याचं समोर आलं आहे.
मंगळवारी BCCIने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, या संघात काही खेळाडूंच्या नावापुढे विशेष चिन्ह देण्यात आलं होतं. नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांच्या नावापुढे (*) लावण्यात आलं आहे. याचा अर्थ त्यांच्या फिटनेसबाबत बोर्डाला अद्याप पूर्ण खात्री नसल्याचं स्पष्ट होतं.
मागील काही महिन्यांत BCCIच्या सेंटर ऑफ एक्सलन्सवर (CoE) दुखापतग्रस्त खेळाडूंच्या व्यवस्थापनावरून प्रश्न उपस्थित झाले होते. हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी संघात स्थान देण्यात आलं, मात्र मैदानावर काही काळ खेळल्यानंतरच त्यांना दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं.
दरम्यान, अलीकडेच CoEचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बोर्डाची भूमिका स्पष्ट केली होती. निवड प्रक्रियेबाबत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. लक्ष्मण म्हणाले होते, “खेळाडूंनाही समजतं की ते राष्ट्रीय मालिकेत खेळण्यासाठी अद्याप पूर्णपणे तयार नाहीत. आमची प्रक्रिया नेहमीच खेळाडू आणि संघकेंद्रित असते. त्यामुळे संवादही योग्य पद्धतीने होत आहे. BCCIने फिटनेस रिपोर्ट्स आणि निवड प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे.”
ते पुढे म्हणाले, “संघाची घोषणा करताना स्पष्टपणे नमूद केलं जातं की काही खेळाडूंची निवड फिटनेसच्या अटीवर करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांनी फिटनेस टेस्ट पास केली नाही, तर त्यांच्या जागी कोणता खेळाडू संघात येऊ शकतो, याची माहिती निवडकर्त्यांकडे असते. ही तर साधी आणि मूलभूत गोष्ट आहे.”
