BCCI New Rule in IPL 2026 Players: आयपीएल २०२६ मधील सर्वच सामने दणक्यात होत आहे. पावसामुळे काही सामन्यांमध्ये व्यत्यय आला, तर चॅम्पियन संघ यंदा मागे पडले असून इतर संघ गुणतालिकेत बाजी मारत आहेत. यादरम्यान बीसीसीआयने हंगाम सुरू असतानाच नवा नियम आणला आहे. बीसीसीआयने प्लेईंग कंडिशन्सबाबत कडक निर्णय घेतला आहे.
हंगाम सुरू होण्यापूर्वीच, बीसीसीआयने सरावासंबंधित नियमांसह काही नियमांमध्ये बदल केले होते. आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सामन्यांदरम्यान प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड न झालेल्या खेळाडूंसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. सर्व खेळाडूंनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाई केली जाऊ शकते.
आयपीएलमध्ये, राखीव खेळाडूंना आता सामन्यांदरम्यान मैदानावर फिरता येणार नाही. केवळ सामन्यासाठी नियुक्त केलेल्या १६ खेळाडूंनाच अत्यावश्यक कामांसाठी जसे की ड्रिंक्स देणं किंवा कोचचा मेसेज पोहोचवणं यासाठी मैदानावर जाण्याची परवानगी असेल. यापूर्वी, राखीव खेळाडू ड्रिंक्स, बॅट किंवा मेसेज देण्यासाठी अनेकदा मैदानावर येताना दिसत होते, परंतु आता यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, सीमारेषेच्या बाहेर जास्तीत जास्त पाच खेळाडूंनाच फिरण्याची परवानगी दिली जाईल. या पाच खेळाडूंचा समावेश निर्धारित १६ खेळाडूंमध्ये केला जाईल. उर्वरित खेळाडूंना डगआऊटमध्येच थांबावे लागेल आणि त्यांना सीमारेषा व एलईडी जाहिरात फलकांसमोर फिरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
संघातील सूत्रांनी क्रिकबझला माहिती दिली की, “आम्हाला अलीकडेच सूचना मिळाल्या आहेत की सर्व बदली खेळाडूंना सामन्यादरम्यान मैदानात फिरता येणार नाही. त्यांना मैदानावर ड्रिंक्स घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. केवळ सामन्यासाठी संघात निवडलेले १६ खेळाडूच मैदानावर जाऊ शकतात. यातील अंतिम अकरा खेळाडूंबाहेरील केवळ पाच खेळाडूच फिरू शकतात. उर्वरित खेळाडू डगआऊटमध्ये बसू शकतात, परंतु त्यांना सीमारेषा आणि एलईडी जाहिरात फलकांच्या दरम्यान जाता येणार नाही.”
माहितीसाठी, आयपीएलमध्ये एका संघात साधारणपणे २५ खेळाडूंचा समावेश असतो. यापैकी १६ खेळाडूंची नावं टीम शीटमध्ये लिहिलेली असतात. नवीन नियमांमुळे मॅच प्लेईंग कंडिशन्समधील (एमपीसी) कलम ११.५.२ आणि २४.१.४ अधिक कडक करण्यात आले आहेत. यामध्ये मैदानावर ड्रिंक्स सोबत नेणं आणि बिब घालण्यासंबंधीच्या नियमांचा आधीपासूनच समावेश होता, परंतु आता त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
