BCCI New Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)कडून नवनवीन नियम लागू केले जात असतात. अनेकदा खेळाडू खोटं वय सांगून आणि खोटी कागदपत्र तयार करुन, निवडकर्त्यांची फसवणूक करतात. याआधीही अशी अनेक प्रकरणं घडली आहेत. खेळाडूंनी आपलं खरं वय लपवून खोटं वय सांगितलं. अशा खेळाडूंना बंदीचा सामनाही करावा लागला आहे. पण आता हे रोखण्यासाठी बीसीसीआय नवीन नियम आणण्याच्या प्रयत्नात आहे.
इथून पुढे क्रिकेटमध्ये वयाची फसवणूक होऊ नये, यासाठी बीसीसीआय मोठे पाऊल उचलणार आहे. याआधी स्टार खेळाडू रसिख सलाम, प्रिन्स यादव, मनजोत कालरा आणि नितीश राणासारख्या खेळाडूंवर वयाची फसवणूक केल्याप्रकरणी बीसीसीआयने बंदीची कारवाई केली आहे. क्रिकब्लॉगरच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आता अशी सिस्टिम तयार करणार आहे, ज्यामुळे खेळाडू वयाची फसवणूक करु शकणार नाही. बीसीसीआयने एका एजेन्सीसोबत करार केला आहे, जी वयाची पडताळणी करण्यासाठी शाळा आणि इतर संस्थांशी संपर्क करेल आणि त्यानंतर चौकशी करुन खेळाडूंची जन्मतारीख वैध घोषित करेल. यादरम्यान आधार कार्ड, जन्म दाखला आणि शाळेतील इतर कागपत्रही तपासले जातील. यासह ही एजेन्सी ऑनलाईन तपासणी करेल. बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याने वयचोरीच्या घटनांना आळा बसू शकतो.
बीसीसीआयने हे नवीन नियम लागू केले, तर वयाच्या फसवणुकीत दोषी आढळणाऱ्या खेळाडूवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा खेळांडूवर बीसीसीआयकडून बंदी घातली जाईल. यासह तो खेळाडू कुठल्याही वयोगटातील क्रिकेटमध्ये किंवा आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करु शकणार नाही. पण जो खेळाडू दोषी आढळून येईल, त्याला आपली बाजू मांडण्याचीही संधी मिळणार आहे. बीसीसीआय अशा खेळाडूंना कारण दाखवा नोटीस बजावेल. त्यामुळे खेळाडू आपली बाजू मांडू शकतील.
जर स्वत:ची बाजू मांडूणही एखादा खेळाडू दोषी आढळून आला, तर त्या खेळाडूवर कठोर कारवाई केली जाईल. त्या खेळाडूवर बीसीसीआयकडून बंदी घातली जाईल. यासह बीसीसीआय लवकरच आपल्या खेळाडूंना बायोमेट्रिक पडतालळणी करण्याचे आदेश देणार आहे.
